|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्ली संघटनेच्या क्रिकेट समितीतून सेहवागचा राजीनामा

दिल्ली संघटनेच्या क्रिकेट समितीतून सेहवागचा राजीनामा 

दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा निर्वाळा, आकाश चोप्रा, राहुल संघवी देखील पायउतार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी सलामीवीर, स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट समितीचा राजीनामा दिला. आकाश चोप्रा व राहुल संघवी यांनी देखील सेहवागपाठोपाठ आपल्या पदाचे राजीनामे दिले. दिल्ली क्रिकेटसाठी आम्ही एकत्रित आलो, वेळ दिला आणि दिल्ली क्रिकेटच्या सुधारणेसाठी शक्य ते प्रयत्न केले आणि आता दिल्ली क्रिकेटच्या हितासाठीच राजीनामा देत आहे, असे सेहवाग याप्रसंगी म्हणाला. क्रिकेट समितीसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने आम्ही तिघे पायउतार होत आहोत, याचाही त्याने उल्लेख केला.

सेहवाग, चोप्रा व संघवी यांनी माजी जलद गोलंदाज मनोज प्रभाकर राज्य संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कायम रहावा, अशी सूचना केली होती. पण, उच्चस्तरीय पदाधिकाऱयांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवला.  प्रभाकरची कारकीर्द मॅचफिक्ंिसगमुळे कलंकित असल्याने कर्णधार गौतम गंभीरला तो गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको होता, असा दावा केला जातो. काहींच्या मते ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात, वैयक्तिक स्वारस्याची अडचण येत्या काही दिवसात उपस्थित होऊ नये, यासाठीही या तिघांनी पायउतार होणे पसंत केले आहे. दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटना लवकरच नवी संहिता अंमलात आणणार असून त्यापूर्वी हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.

दिल्ली संघटनेतील एका पदाधिकाऱयाने मात्र गंभीरच्या वादाशी या राजीनाम्याचे काहीच देणेघेणे नाही, असा दावा केला. ‘गौतम गंभीर नेहमी पारदर्शक रहात आला आहे आणि मॅचफिक्ंिसगमुळे वादात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीने दिल्लीच्या ड्रेसिंगरुममध्ये असावे, त्याला पसंत नव्हते. पण, यावरुन गंभीर व सेहवाग यांच्यात वाद झाले असावेत, असे वाटत नाही. सेहवाग दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटना अध्यक्षांच्या पॅनेलमध्ये तज्ञ म्हणून कार्यरत असल्याने भविष्यात अडचण होऊ नये, यासाठी सेहवागने क्रिकेट समितीतून राजीनामा दिला असावा. संघवी मुंबई इंडियन्सशी संलग्न आहे. त्यामुळे, त्याचीही हीच समस्या होती’, असे सदर पदाधिकाऱयाने म्हटले.

स्वतः गंभीरने देखील ट्वीट करत प्रभाकरला माझ्या विरोधामुळे त्या तिघांनी राजीनामे दिले, असा चुकीचा आरोप होत असल्याचे स्पष्ट केले. 20 सप्टेंबर रोजी लोढा समितीच्या शिफारशी लागू होतील व क्रिकेट समिती बरखास्त होईल. त्यामुळे, त्यांनी राजीनामे दिल्याचे मला सांगितले गेले आहे, असे तो म्हणाला.