|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » परतीच्या चाकरमान्यांचे हाल

परतीच्या चाकरमान्यांचे हाल 

गणेशोत्सवाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर चाकरमानी मुंबईकडे निघू लागले. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे व रा. प. महामंडळाने केलेल्या सोयी कमी पडल्या. खासगी वाहतूकदारांनी आलेल्या हंगामाचा चांगला लाभ घेतला. त्याचवेळी महामार्ग किमान दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांना अंशतः यश लाभले.

कोकणात गणेशोत्सव म्हणजे सर्वात लाडका उत्सव. वर्षभरात गावी येणे कधी शक्य झाले नसेल तरी भाद्रपद चतुर्थीला चाकरमानी मुंबईकर कोकणी माणूस गावाकडे निश्चितपणे येतोच. लक्षावधी लोक आपल्या कुटुंबासह गावी येत असतात. गणेशोत्सव ज्या दिवशी असेल त्यापूर्वी कितीतरी महिने आधी रेल्वेची आरक्षणे संपून जातात. काही वेळा तर ज्या दिवशी आरक्षण सुरु होते त्याच दिवशी अवघ्या काही तासात हे आरक्षण संपून जाते. रेल्वेकडून जादा रेक उपलब्ध केले जातात. देशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये असलेले रेक गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर वळवले जातात. रा.प. महामंडळ कोकण प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाडय़ांची व्यवस्था करत असते. खासगी वाहतूक द्वारे गणेशोत्सवाच्या काळात जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात येते. एकूणच उपलब्ध व्यवस्थेमध्ये अधिकाधिक प्रवाशांच्या सोयी निर्माण करण्याचे काम खासगी तसेच सरकारी सार्वजनिक वाहतूकदार करत असतात. तथापि कोकणात येणाऱया प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या व्यवस्था पुऱया पडत नाहीत. अनेक लोक मुंबईतून खासगी वाहने करुन गावाकडे येण्याचा पर्याय निवडतात. आरक्षण न मिळाल्याने काही गणेशभक्त पुणे अथवा कोल्हापूर मार्गे कोकणातील घरी येण्याची योजना करत असतात. गणेशोत्सवाला गावी जाण्याचे नियोजन 3 ते 4 महिने पूर्वी करूनही योग्य व्यवस्था उपलब्ध होतेच असे नाही. मागणी मोठी आणि पुरवठा कमी यामुळे मुंबईहून गावाकडे येणारे लोक नेहमीच हैराण होत असतात. असलेल्या व्यवस्थेतून गणेशभक्त गावाकडे पोहोचल्यानंतर गणेशोत्सवाचा मुख्य भाग मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. गणेश चतुर्थीनंतर गौरीचा सण पार पडल्यानंतर चाकरमानी हळूहळू मुंबईकडे निघू लागतात. पुन्हा एकदा रस्त्यांवर कोंडी, खचाखच भरलेल्या रेल्वे गाडय़ा असे चित्र पुढे येत आहे.

कोकणातून मुंबईकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करण्यात येतो. चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर महामार्गाची दुर्दशा झाल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्याचा दौरा केला. सोबत महामार्गाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. महामार्ग दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले खरे, पण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱया या रस्त्यांविषयी राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी निवेदन करणे हे कोकणी जनतेसाठी लक्षणीय होते.

यावर्षी कोकणात झालेला पाऊस हा सामान्यच म्हणावा लागेल. तरीही त्यावर पडलेल्या खड्डय़ांचे केवळ पावसाकडे बोट दाखवून कसे समर्थन करता येईल. हा रस्ता खड्डेमुक्त होण्यासाठी अंतिम तारीख काय असेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही म्हणत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी शासन यंत्रणेची जबाबदारी कशी आहे ते लोकांसमोर स्पष्ट केले.

कंत्राटदारांना चौपदरीकरणातील रस्ते बांधणीसोबत असलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या कंत्राटदारांना ठरलेल्या रकमा सरकारकडून वेळीच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर ठरावीक मुदतीत कंत्राटदार काम करत नाहीत म्हणून पर्यायी कंत्राटदारांकडून काम करण्यात येते. म्हणून खड्डे भरण्याच्या कामाला विलंब होत आहे, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग पाहणीचे दोन दौरे केले. त्यांच्याकडून महामार्ग दुरुस्तीच्या वेगवेगळ्या डेडलाईन देण्यात येत होत्या. त्याचवेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता यांना पत्र पाठवून त्याबद्दल विचारणा केली होती. मुख्य अभियंत्यांकडून अशा पत्रांना उत्तर देण्याचे सौजन्यदेखील दाखवले गेले नाही. महामार्गाच्या कंत्राटदारांच्या बैठकीत बांधकाम मंत्र्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या उपाययोजना शासनस्तरावरून झाल्या आहेत असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुळात केंद्र सरकारचे बांधकाम खाते आणि चौपदरीकरण ठेकेदार यांचे करार काय झाले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी होत आहे याचा आढावा मंत्र्यांकडून घेतल्याचे लोकांना कळले नाही. केंद्रीय बांधकाम खाते आणि कंत्राटदार यांची अब्रू जाणार नाही याची काळजी घेऊन वेगवेगळ्या डेडलाईन रस्ता दुरुस्तीसाठी देण्यात येत होत्या.

या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास गौरी सणानंतर सुरु झाला आहे. महामार्गाच्या खड्डे मुक्तीची आशा असली तरी या गणपती हंगामात खड्डेमुक्त रस्ता पहायला मिळणे दुरापास्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या विविध व्यवस्था अपुऱया ठरल्याने चाकरमानी मुंबईकडे जाताना मोठय़ा गैरसोयीचा सामना करत आहेत. दक्षिणेकडून मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱया अति जलद गाडय़ांमध्ये जलद गाडय़ांचे प्रवासी भरून नेण्याची सुविधा तात्पुरत्या स्तरावर करून देण्यात आली आहे. यामुळे गर्दीचा प्रश्न काहीसा दूर झाला असला तरी प्रत्यक्षात हा प्रश्न संपला नाही. रत्नागिरीत मंगळवारी रेल रोको करण्यात आला. अधिकाऱयांच्या हस्तक्षेपामुळे हे रेल्वे गाडी मुंबईकडे रवाना झाली असली तरी गाडीत प्रवेश न मिळालेले परतीच्या मार्गावरील चाकरमानी खूपच अस्वस्थ आहेत. खड्डयांच्या रस्त्यापेक्षा रेल्वे मार्ग चांगला असे म्हणणाऱया लोकांना रेल्वेत पाऊल ठेवायला मिळाले तरी भरपूर असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सुकांत चक्रदेव