|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भातशेती करपल्याने शेतकरी हताश

भातशेती करपल्याने शेतकरी हताश 

पावसाने दडी मारल्याचा शेतीवर गंभीर परिणाम

पाणथळीच्या शेतीला पाणी देण्याची वेळ

यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याचे संकट

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

यावर्षी जिल्हय़ातील शेतकऱयांना खुश केलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पावसाअभावी भातशेती करपू लागल्याने शेतीच्या उत्पादनात मोठी घट होण्याचे संकट निर्माण झाले आहे. या बाबत प्रशासन स्तरावरून झालेल्या नुकसानीची दखल घेण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

खरिपाच्या हंगामासाठी रत्नागिरी जिल्हय़ात शेतकऱयांना सुधारित व संकरित भातबियाण्यांचा यावर्षी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला आहे. जिल्हय़ात 6,265 क्विंटल एकूण बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर यांत्रिकीकरणाचीही मोठय़ा प्रमाणात येथील शेतकऱयांनी कास धरली आहे. यावर्षी जिल्ह्य़ात कृषी विभागाच्यावतीने सुमारे 71 हजार हेक्टर क्षेत्र भाताचे उत्पादन घेण्याचे उद्दीष्ट डोळय़ासमोर ठेवले आहे पण ते कितपत साध्य होईल, या बाबतही आता शंका व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून आजपर्यंत पावसाचा टिपूसही पडलेला नाही. भातशेती पसवू लागली आणि पावसाने दडी मारली. प्रचंड उन्हाच्या तडाख्याने शेतजमिनी कोरडय़ा पडल्या आहेत. जमिनीला भेगा गेल्याने भातशेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे. लेंब बाहेर टाकण्याच्या वेळेत पावसाने दडी मारल्याचा परिणाम ती रखरखत्या उन्हामुळे उभी शेती करपली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. सडय़ावरील शेतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. तर पाणथळीच्या जागावरील शेतीला पाणी देण्याची वेळ येथील शेतकऱयांवर आली आहे. पिकांवर झालेल्या या गंभीर परिस्थितीचा प्रशासन स्तरावरून सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

Related posts: