|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रुग्णांच्या तक्रारींची विश्वजित राणेंकडून दखल

रुग्णांच्या तक्रारींची विश्वजित राणेंकडून दखल 

हृदयविकार विभागात येणाऱया रुग्णांचे व्हायचे हाल

प्रतिनिधी/ पणजी

गोमेकॉच्या हृदयविकार विभागात नव्याने तपासणीसाठी येणाऱया रुग्णांचे वा त्यांच्या नातेवाईकांचे होणारे प्रचंड हाल लक्षात घेऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्वरित लक्ष घालण्याचे आदेश गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांना दिले.

गोमेकॉच्या हृदयविकार विभागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राणे यांनी चार अतिरिक्त डॉक्टर्स घेतले. तरीही रुग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना नावनोंदणी करण्यासाठी वा नव्याने तपासणी करण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत रहावे लागते. सकाळी 9 वा. प्रवेशद्वार खुले होते व तिथे कागदपत्रांची तपासणी करुन नंतर त्या काउंटरवर नंबर दिला जातो. त्यानंतर खाली जाऊन विविध विभागात तपासणी सुरु होते. गोव्याच्या विविध भागातून येणाऱया रुग्णांना एकदाचा आपला क्रमांक तिथे लावायचा असतो. अनेकदा डॉक्टर्स केवळ 30 वा 40 रुग्णांचीच तपासणी करणार असे काउंटरवर सांगून ठेवत असल्याने आपला नंबर लागावा यासाठी रुग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांना पहाटेपासून चिंचोळ्य़ा जागेत तासनतास उभे राहावे लागते. कैकवेळा उभे राहून पाय दुखू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक आपापल्या फाईल्स रांगेत लावून ठेवतात.

अनेकदा हृदयविकाराच्या रुग्णांना स्वतःच येऊन तिथे उभे राहावे लागते. शनिवारी हा प्रकार लक्षात येताच एका रुग्णाच्या नातेवाईकाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गोमेकॉतील माहिती सचित्र मोबाईलवर पाठवून दिली.  त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले व गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक तसेच डॉ. बांदेकर यांना लक्ष घालण्यास सांगितले. यानंतर रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल व या विभागाचा काउंटर अन्यत्र हलविला जाईल. जेणेकरुन कोणालाही पहाटेपासून ताटकळत राहण्याची आवश्यकता पडणार नाही, असे डॉ. नाईक व डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राणे यानी तातडीने लक्ष घालून स्वतः परिस्थितीचा आढावा घेतल्याबद्दल अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले. अलीकडे प्रशासनाकडे वा मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर क्वचितच काही नेते दखल घेतात. आरोग्यमंत्री राणे मात्र त्वरित लक्ष घालतात. आरोग्य क्षेत्रात बदल करताना रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आपला इरादा असल्याचे राणे म्हणाले.