|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एटीएम चोरीचा युवकाला फटका

एटीएम चोरीचा युवकाला फटका 

प्रतिनिधी/ बेळगाव

एटीएम कार्ड बंद झाले आहे नव्या कार्डसाठी जुन्या कार्डवरील क्रमांक सांगा असे सांगत बँक ग्राहकांची रक्कम हडप करण्याचे प्रकार सुरु असतानाच पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रात गेलेल्या एका युवकाचे एटीएम कार्ड चोरुन भामटयाने केवळ तासाभरात बँक खात्यातील 40 हजार रुपये हडप केल्याची घटना शनिवारी घडली.

या घटनेने एकच खळबळ माजली आहे. पिरनवाडी येथील बबन नामक एक युवक पैसे काढण्यासाठी शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोर्ड कंपाऊंडजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रात गेला. त्याचवेळी एक भामटा आधीच तेथे दाखल झाला होता. त्याने बबन यांना पैसे काढण्यास सांगितले.

गडबडीत असणाऱया बबन यांनी पैसे काढण्यासाठी आपले एटीएम कार्ड मशिनमध्ये घातले. क्षणार्धात भामटय़ाने ते कार्ड पळविले. त्यानंतर 12.45 पर्यंत केवळ तासाभरात त्याने बबन यांच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये लांबविले. या संबंधी मोबाईलवर मॅसेज आल्यानंतरच हा प्रकार बबन यांच्या लक्षात आला.

एटीएम कार्ड चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी एसबीआयच्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधून आपले एटीएम कार्ड त्वरीत बंद करण्याची विनंती केली. मात्र बँकेकडून आपल्याला व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नाही. या प्रक्रियेसाठी तब्बल तास लागला. तितक्यात आपल्या बँक खात्यातून 40 हजार रुपये कमी झाले होते, असे या युवकाने सांगितले होते.

या घटनेनंतर धक्का बसलेल्या युवकाने तक्रार करण्यासाठी मार्केट पोलीस स्थानक गाठले. मात्र पोलिसांनी त्याला पोलीस मुख्यालयातील सीईएन पोलीस स्थानकात जाण्यास सांगितले. शनिवारी सकाळी 11.30 ते 12.45 या वेळेत हा प्रकार घडला असून शेवटी कार्ड चोरणाऱया भामटय़ाने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन 11 हजार रुपयांचे डिझेल घातले आहे.