|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अटलजी आणि भालजी पेंढारकर आरएसएसचे विद्यार्थी

अटलजी आणि भालजी पेंढारकर आरएसएसचे विद्यार्थी 

अटलबिहारी वाजपेयी राजकारण समाजकार्यात माहिर, तर भालजी पेंढारकर समाजकार्यात व चित्रपट निर्मितीमध्ये माहिर. या दोन्ही महान व्यक्तींना माझा सलाम! दोघांच्या वाटा एकच असल्या तरी स्वभाव आणि व्यवसाय वेगवेगळे. वाजपेयींनी राजकारण व समाजकारण शेवटपर्यंत केले तसेच भालजींनी समाजकार्य करत चित्रपट व्यवसाय केला. भालजींचा जीवनपट पुस्तकरुपात मी लिखाण केलेले असून ते लवकरच प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे.

कोल्हापुरात मध्यवर्ती ठिकाणी 1917 साली विद्यापीठ ही शाळा स्थापन करण्यात आली. भालजी शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे विद्यापीठाचे कधीच विद्यार्थी नव्हते. पण 1928 साली भालजींचा विद्यापीठाशी संबंध आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्यानंतर 1982 पर्यंत भालजी या संस्थेचे अध्यक्ष राहिले. त्यांना विद्यापीठाकडे आणण्याचे काम शिक्षण संस्थेचे संस्थापक वासुदेव तोफखाने यांनीच केले. विद्यापीठ हायस्कूलच्या मदतीसाठी भालजींनी ‘क्रांतीकारक’ हे नाटक लिहिले. हे नाटक शाळेच्या लोकांना प्रभावीपणे कल्पना देऊ शकेल, हे पाहून तोफखानेनी ते नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी भालजींना सर्वतोपरी मदत केली.

कोल्हापुरात आर.एस.एस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालू करण्याच्या उद्देशाने बाबाराव सावरकर व डॉ. के.ब.हेडगेवार 1928 साली विद्यापीठ हायस्कूलमध्ये आले. भालजींना हे समजताच त्या दोघांना भालजी भेटले. त्याआधी बाबाराव सावरकरांनी भालजींच्याबाबतीत सर्व कल्पना हेडगेवारांना दिली होती. हेडगेवार यांनी भालजींचे निरीक्षण करून संघाची शाखा सुरू करून भालजेंवर जबाबदारी टाकण्यात कोणतीही हरकत नाही असे सांगून संघाची शाखा कोल्हापुरात सुरू केली. काही दिवसांनी भालजी नागपुरात गेले. हेडगेवारांकडे स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यांच्याबरोबर अमरावती, अकोला या ठिकाणी डॉक्टरांनी घेतलेल्या सभा आणि तिथल्या शाखा पाहिल्या. त्यांच्याबरोबर संघ कार्याची माहिती घेण्यासाठी एक तरुण राहत होता. भालजींची त्या तरुणाशी चांगली मैत्री जमली. तो तरुण म्हणजे स्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी. भालजी आणि वाजपेयी यांनी संघ कार्याचा अभ्यास एकत्रितपणे केला. ते शेवटपर्यंत जीवलग मित्रच होते.

नागपूरहून परतल्यानंतर भालजींनी संघकार्यावर आपले लक्ष केंद्रीत केले. कोल्हापुरात संघाचे काम चांगले होत होते. पण कुठून कशी कळ फिरली आणि कोल्हापूर दरबारकडून संघावर बंदी घालण्यात आली. चांगल्या कार्याला मदत करणारी माणसे थोडी असतात. पण चांगल्या कामास खीळ घालणाऱया विघ्नसंतोषी लोकांची समाजात वाण नसते. भालजींनी संघ सहकाऱयाना बरोबर घेऊन दिवाणबहादूर यांचे कार्यालय गाठले. इतरत्र चालू असलेल्या हिंदूनि÷ कार्याला इथे आणि छत्रपतींच्या राज्यात बंदी यावी हे माझ्यासारख्या शिवभक्ताला खटकते. ही बंदी उठवण्यासाठी आपण काही करावे अशी विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे असे खडे बोल सुनावले.

दिवाणबहाद्दूर सुर्वे यांनी अधिक काही न सांगता संघावर बंदी आहे एवढेच त्यांना सांगितले. त्यावर भालजींनी उपाय शोधून काढलाच  आणि दिवाण बहादूर सुर्वे यांना सांगितले. त्यांनी ‘राजाराम सेवक संघ’ काढून संघाचे कार्य सुरू केले. सरसंघचालक हेगडेवार यांनीही भालजींच्या या तात्पुरत्या पर्यायाला मान्यता दिली आणि हजरजबाबीपणाबद्दल त्यांनी भालजींचे कौतुकही केले.

अटलबिहारी वाजपेयींनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला त्यावेळी ते समाजकारण मानले जात होते. त्यात नेतृत्त्व करू पाहणारे सामान्य माणसांसारखेच होते आणि त्यांना आपल्यातलेच मानण्याची सामान्यांचीही प्रथा होती. निश्चित विचारधारेने आपणास हा समाज घडवायचा आहे आणि मूर्ती घडविताना भागधेय आहे, असेच हे राजकारणी मानत. तो काळ शामाप्रसाद मुखर्जी, राममनोहर लोहिया, नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय, अच्युतराव पटवर्धन अशी अनेक बुद्धीवादी मंडळी समाजकारण करत होती. तो काळ 1942 चा. महात्मा गांधी आघाडीवर होते. तर पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल जोमात होते. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर महाविद्यायीन खिडकीतून जगाकडे पाहण्याचा अटलबिहारींना या सगळय़ाने खुणावले नसते तर नवलच. वडील शिक्षक आणि कवी. ग्वाल्हेरात त्यावेळी आर्य समाजाचा जोर होता. वाजपेयी आर्य समाजात दाखल झाले. आयुष्यात आपल्याशी संबंधित नसलेल्या कोणत्याही विचारधारेविषयी एक प्रकारचे ममत्त्व वाजपेयींच्या स्वभावात कायम दिसत राहिले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील नवीनच जन्माला आला होता. तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या अटलबिहारींना संघाने देखील खुणावले. त्यामुळे वाजपेयी दोन्ही संघटनात सक्रीय होते. वाजपेयी यांच्या समाजकारणाची सुरुवातच मुळात शामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाळ उपाध्याय यांचे बोट धरूनच झाली. त्यांच्या समाजकारणास ठोस राजकीय वळण मिळाले ते महात्मा गांधीच्या हत्येनंतर. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली आणि त्यातूनच जनसंघाची निर्मिती झाली आणि वाजपेयी यांची जनसंघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. शामाप्रसाद मुखर्जी यांनी जेव्हा काश्मीरात उपोषण केले तेव्हा त्यांच्याबरोबर वाजपेयी हेते. त्याच आंदोलनात मुखर्जी यांचे निधन झाले.

सन 1957 ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि वाजपेयी लोकसभेवर निवडून आले. कला, साहित्य, संस्कृती यांचे प्रेम रक्तातूनच मिळालेल्या वक्तृत्वाला प्रशिक्षणाची जोड मिळाली. अशा या महान नेतृत्वाचे कौतुक म्हणून पं. नेहरुंनी देखील वाजपेयी यांची मुक्तकंठाने स्तुती केली. हा मुलगा उद्या देशाचे नेतृत्त्व करेल अशी उच्चारणा केली आणि ती तंतोतंत खरी ठरली. भारतीय जनता पार्टी या पक्षाची निर्मिती झाल्यानंतर लोकसभेवर दोन खासदार निवडून गेले. त्यानंतर वाजपेयी यांची राजकारण व समाजकारणावरची पकड समाजाने ओळखली. सन 1999 च्या निवडणुकीत लोकसभेवर पुन्हा भाजपला निवडून दिले पण लोकसभेत लागणारे बहुमत नसल्याने एकूण 23 पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले आणि बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आणले. पण एकूण तेवीस पक्षांना बरोबर घेऊन सरकार चालवणे तेवढे सोपे काम नव्हते. तरीपण राजकारण व समाजकारण या मधला दुवा असलेल्या वाजपेयी यांनी सरकारची पाच वर्षे पूर्ण केली. त्याचाच फायदा पुढे भाजपला  2014 ला झाला आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली  बहुमताचे भाजपचे सरकार सत्तेत आले. एवढेच नाही तर, स्वपक्षाचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, 30 राज्यांचे राज्यपाल एवढी संपत्ती मागे ठेवून महान दीपस्तंभ अनंतात विलीन झाला. मोदी सरकारने व भाजपने सवंग योजनाची घोषणा करून समाजावरची पकड  ढिली न करता, राजकरण व समाजकारण यांची सांगड घालून पुढील वाटचाल केली तरच वाजपेयींना खरी श्रद्धांजली ठरेल.

नामदेव कृष्णा पाटील, कांदिवली पू. मुंबई