|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक

सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक 

जुळय़ा भावांचाही समावेश  : 27 पर्यंत पोलीस कोठडी 

अल्पवयीन युवतीवरील सामूहिक बलात्कारप्रकरण 

मळगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवरही युवतीचे शोषण

‘ते’ लॉज लोकप्रतिनिधीच्या मालकीचे ओळखपत्राविना दिली रुम

प्रतिनिधी / सावंतवाडी:

अल्पवयीन कॉलेज युवतीवर मळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक 3 आणि स्टेशनजवळील एका लॉजवर तिघांनी पाण्यात गुंगीचे औषध घालून सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने मळगाव आणि सावंतवाडी परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (28, रा. आकेरी-घाडीवाडी), प्रशांत कृष्णा राऊळ (23, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी), राकेश कृष्णा राऊळ (23, मळगाव-कुंभार्लीवाडी) यांना अटक केली आहे. त्यांना रविवारी दुपारी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, यातील संशयित प्रशांत व राकेश राऊळ हे जुळे भाऊ आहेत. या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 दरम्यान, यातील ज्या लॉज व स्टेशनवर ही घटना घडली तेथील पाहणी पोलिसांनी केली आहे. लॉजमध्ये संशयित रामचंद्र घाडी याच्या नावाची एन्ट्री रजिस्टरमध्ये असून त्याला ओळखपत्राशिवाय लॉजमधील रुम देण्यात आला. त्यामुळे या लॉजचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉज असलेली इमारत ही एका बडय़ा लोकप्रतिनिधीच्या मालकीची असून ज्याने लॉज चालविण्यास घेतले तो मालकही लोकप्रतिनिधी असल्याची माहिती समोर आली आहे.

आधीही दिली होती धमकी

सावंतवाडी शहरात एका कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱया कॉलेज युवतीची ओळख फेसबुकवरून वर्षभरापूर्वी आकेरी येथील रामचंद्र घाडी याच्याशी झाली होती. त्यावेळी रामचंद्र याने तिला “मी तुला लाईक करतो. तू मला लाईक करतेस का?’’, असे विचारले होते. त्यावेळी त्या युवतीने आपण लहान असल्याचे सांगून नकार दिला होता. दरम्यानच्या काळात 20 ऑगस्टला ही युवती शहरात मैत्रिणीची वाट पाहत थांबली असता, रामचंद्र घाडी तेथे आला. त्यावेळी त्याने तिला “माझ्यावर प्रेम केले नाही तर तुझी बदनामी करू’’, अशी धमकी दिली. त्यानंतर सदर युवती घरी गेली. त्यानंतर त्यांच्यात संपर्क झाला नाही.

फसवून नेले लॉजवर

त्यानंतर शुक्रवार 21 सप्टेंबरला पीडित युवती मैत्रिणीसह सावंतवाडी शहरात गणपती पाहण्यासाठी आली होती. गणपती पाहून सदर युवतीच्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या. तर ती युवती तिच्या मित्रासोबत शहरातील एका कोल्ड्रिंकमध्ये गेली. तेथे लिंबू सरबत पिऊन बाहेर आली. त्यावेळी रामचंद्र घाडी तेथे आला. त्याने तिला “तू बॉयप्रेंडसोबत फिरतेस. याबाबत तुझ्या आईवडिलांना सांगतो’’, अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाईलही जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिने याबाबत आई वडिलांना न सांगण्याची विनंती केली. तरी त्याने तिच्याशी हुज्जत घातली. तिला घरी सोडतो, असे सांगून तिला घरी न नेता मळगाव रेल्वेस्थानकासमोरील लॉजवर नेले. तेथे तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास तो तिला लॉजमधून बाहेर घेऊन आला. तिला थोडय़ा अंतरावर सोडून आपण पेट्रोल भरून येतो, असे सांगितले आणि निघून गेला.

दोघांच्या केले स्वाधीन

त्यानंतर युवती घरी येण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागली. त्यावेळी स्टेशनजवळील वडापावच्या गाडीवर रामचंद्र घाडी याने त्याचे दोन मित्र तुला घरी सोडून येतील, असे सांगून त्या युवतीला प्रशांत व राकेश राऊळ यांच्या ताब्यात दिले. त्या दोघांनी मद्यप्राशन केलेले होते. त्यांच्याबरोबर जाण्यास या युवतीने नकार दिला. परंतु गुंगीचा प्रभाव असल्यामुळे तिला चक्कर आली. त्यानंतर त्या दोघांनी तिला मळगाव रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफार्म नंबर 3 मधील शेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान दोघेही तिच्यासोबत रात्रभर होते.

झाडीत घेतला आश्रय

शनिवारी सकाळी तिला जाग आली. तिला ते दोघे जवळच झोपल्याचे दिसले. तिच्या पोटातही दुखत होते. तिने घाबरून बाजूच्या झाडीत आश्रय घेतला. त्यावेळी तेथील एका व्यक्तीने तिची विचारपूस करत एसटीने घरी जाण्यास सांगितले. पीडित युवतीने आई-वडिलांना घाबरून आपल्या मित्राला फोन करून रेल्वेस्टेशनवर बोलावले. त्यानेही तिला आई-वडील तुला शोधत असल्याचे सांगितले.

दरम्यानच्या काळात त्या मित्राने पोलिसांना घेऊन रेल्वेस्टेशन गाठले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. रामचंद्र ऊर्फ अभय याने या युवतीशी फेसबुकवर मैत्री केली. तिला ब्लॅकमेल करून लॉजवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने या युवतीला आपल्या मित्रांच्या स्वाधीन केले. सामूहिक अत्याचाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रामचंद्र घाडी सराईत गुन्हेगार

रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी हा आकेरी घाडीवाडी येथील असून तो पोलिसांच्या दप्तरी हिस्ट्रिशिटर म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्याच्या नावावर चोरीचे गुन्हे कुडाळ आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. घाडी याचा विवाह झाला होता. मात्र, त्याच्या प्रतापामुळे पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. तर मळगाव येथील त्याचे मित्र प्रशांत आणि राकेश हे जुळे भाऊ असून त्यांचे रेल्वेस्टेशनजवळ घर आहे. गुंडगिरी करून ते गावातही दहशत माजवित असत. रेल्वेस्टेशनवर तिकीट बुकिंग करण्याचे काम ते करत असत.
शुक्रवारी रात्रीही ते तिकिट बुकिंग करताना काहींना दिसले होते. या दोघा भावांच्या प्रतापामुळे मळगावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे पोलीस काय करत होते?

पीडित युवतीवर मळगाव रेल्वेस्टेशनच्या प्लॅटर्फाम क्रमांक तीनवरील शेडमध्ये अत्याचाराची घटना घडली. रेल्वेस्टेशनवर रेल्वे पोलीस कार्यरत असतात. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असतात. असे असताना ही घटना घडल्याने रेल्वे पोलीस काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तर युवती गायब असल्याची माहिती वडिलांनी शुक्रवारी रात्रीच पोलिसांना दिल्यानंतर पोलीस मळगाव रेल्वेस्टेशनवर तिच्या शोधासाठी गेले होते. तर लॉजमध्ये रुम भाडय़ाने देण्यापूर्वी ओळखपत्र घेणे आवश्यक होते. रामचंद्र याने स्वत: लॉजच्या बुकमध्ये एन्ट्री केली. मात्र, ओळखपत्र दिले नाही. युवतीच्या नावाचीही एन्ट्री केली नाही. तसेच तिचे ओळखपत्र दिले नाही. ओळखपत्र न घेता लॉजची रुम भाडय़ाने देण्यात आली. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

पोलिसांनी या तिघांना घटनास्थळी नेले होते. लॉजचीही पोलिसांनी तपासणी केली. फॉरेन्सिक विभागानेही नमुने घेतले आहेत. या तिघांची येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तिघांनीही गुन्हय़ाची कबुली दिली असून पोलिसांनी गुन्हय़ासाठी वापरलेली रामचंद्र घाडी याची गाडी जप्त केली आहे. तर राऊळ बंधुंची गाडी जप्त करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राऊळ बंधुंना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. तर घाडीला शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. पोलीस रेल्वेस्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेज पाहणार आहे.

तिघांविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्कार, अपहरण, बालहक्क लैंगिक अपराधापासून संरक्षण 2012 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.