रेटिंग आणि टिंगल

परवाची गोष्ट आहे. नवा शर्ट घेण्यासाठी तयार कपडय़ांच्या दुकानात गेलो. सेल्समनने माझ्याबरोबर दुकानभर फिरून मला शर्ट दाखवले. मी एक शर्ट घेतला. निघताना कॅशियर आणि सेल्समन म्हणाले, “साहेब, समोरच्या मशीनवर तुमचं रेटिंग द्या.’’
रेटिंग म्हणजे काय, तर तिथे एक ते पाच चांदण्या असे पर्याय होते. एक चांदणी म्हणजे वाईट सेवा. दोन म्हणजे… असं करीत पाच चांदण्या म्हणजे खूप आवडलेली सेवा. आवडलेल्या सेल्समनचं नाव आणि आपला मोबाईल नंबर. मी रेटिंग दिलं आणि बाहेर पडलो.
हल्ली इंटरनेटवर वृत्तपत्रे वाचताना देखील प्रत्येक लेख वाचून झाल्यावर संगणक पाच चांदण्या दाखवतो. लेख किती आवडला ते विचारतो. विनोदी आणि टिंगल करणारा लेख वाचल्यावर देखील टिंगल किती आवडली याचं रेटिंग विचारतो. कॅब ऊर्फ टॅक्सी केल्यावर मोबाईलवर रेटिंग विचारतात. हॉटेलमध्ये जेवल्यावर बिल, टीप आणि रेटिंग मागतात.
परवा एका श्रीमंत बालमित्राने मॉलमधल्या हाय फाय दुकानात पाणीपुरी खायला नेलं. हाय फाय म्हणजे काय तर रस्त्यावर वीस रुपयांना मिळणारी प्लेट शंभर रुपयांना होती. बसायची जागा वातानुकूलित होती. त्याने पाणी पुरीसाठीचं तिखट आणि गोड पाणी नीट झाकून ठेवलं होतं. पाणी पुरीच्या प्लेट्स स्वच्छ असाव्यात असा संशय येत होता. पुऱया देताना विपेत्याने हातात प्लास्टिकचे हातमोजे घातले होते. पाणी पुरी खाऊन धन्य झाल्यावर स्टॉलवरचा लॅपटॉपधारी तरुण जवळ आला आणि रेटिंग विचारू लागला. मी त्याला उदारपणे पाच चांदण्या दिल्या. कुणीतरी सांगितलं की तो स्टॉलधारक नववी पास आहे. लाखो कमावतो. पण संगणक वापरता येत नाही म्हणून त्याने रेटिंग गोळा करण्यासाठी आणि सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी दहा हजार रुपये पगारावर हा पदवीधर नेमला आहे. भजी, वडापाव आणि पाणीपुरी विकणारे कसे रोजगार निर्माण करतात, पहा.
रिक्षाला हात केल्यावर तो थांबतोच असे नाही. पण काही दिवसांनी तो थांबून आपल्याला विनम्रपणे नकार देऊ शकेल आणि निरोप घेताना रेटिंग मागू शकेल. रिक्षा… येते आणि जाते. येताना नकार देते, जाताना चांदण्या मागते… अशी कविता सुचेल. पोलीस चौकीतून बाहेर पडताना पोलिसांनी रेटिंग मागायला देखील हरकत नाही. त्यांना काय पाचच्या पाच चांदण्या द्याव्याच लागतील.