|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातमधील पटेलांचा पुतळा ‘मेड इन चायना’

गुजरातमधील पटेलांचा पुतळा ‘मेड इन चायना’ 

चित्रकूट / वृत्तसंस्था :

मध्यप्रदेशात यंदा वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून काँग्रेसने आतापासूनच प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यात पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच प्रचाराची धूरा सांभाळत आहेत. राहुल यांनी गुरुवारी मध्यप्रदेशच्या विंध्य भागात रोड शो केला आहे. आज तरुणाईसमोर रोजगाराची समस्या आहे, परंतु सरकार चीनच्या तरुणाईला रोजगार मिळवून देण्यात मग्न आहे. गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा उभारला जाणारा पुतळा आमच्या ‘बूट आणि शर्टाप्रमाणे’ मेड इन चायना असेल, पंतप्रधानांनी आमचा विश्वास तोडल्याचा दावा राहुल यांनी यावेळी केला.

चीनचे युवक सेल्फी घेतील आणि मोबाईलमागे पाहून तो निर्माण झालेले ठिकाण चित्रकूट कुठे आहे याचा विचार करतील असा दिवस मी पाहू इच्छित असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. तत्पूर्वी राहुल यांनी चित्रकूट येथील कामतानाथ मंदिरात पूजा करून देशाच्या समृद्धतेसाठी प्रार्थना केली. मंदिर दर्शनावेळी राहुल यांच्यासोबत मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ आणि दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. विंध्य भाग काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातो, 2013 च्या निवडणुकीत याच भागात काँग्रेसने चांगले यश मिळविले होते.

सत्तेवर येताच कर्जमाफी

काँग्रेस पक्ष सत्तेवर येताच शेतकऱयांचे कर्ज माफ केले जाणार आहे, तसेच गब्बर सिंग टॅक्स जीएसटीत बदलला जाईल. मध्यप्रदेशातील शिक्षणव्यवस्थेला व्यापमंने उद्ध्वस्त केले आहे. राज्यात महिला अत्याचार, कुपोषण, शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. काँगेसला संधी दिल्यास जनतेच्या ‘मन की बात’नुसार सरकार चालविले जाईल असा दावा राहुल यांनी केला आहे.