|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत चोऱया करणारी टोळी ओरोसला जेरबंद

रत्नागिरीत चोऱया करणारी टोळी ओरोसला जेरबंद 

स्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई

महालक्ष्मी मॉलसस तीन चोऱयांची कबुली

प्रतिनिधी /रत्नागिरी, ओरोस

रत्नागिरीतील महालक्ष्मी मिनी मॉलसह तीन दुकाने फोडणाऱया आंतरराज्य टोळीला शनिवारी ओरोस फाटा येथे जेरबंद करण्यात आले. रत्नागिरीबरोबरच राज्याच्या अनेक शहरांसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवामध्ये चोरटय़ांच्या या टोळक्याने उच्छाद मांडला होता.

सुरेश नायक नारायण रेक्युला (46, रा. बेळळारी, कर्नाटक), शंकर आप्पाराव सिम्मा (43, आंध्रप्रदेश), रवि सुबाराव रेगुला (52, आंध्रप्रदेश), मंजुनाथ रविकुमार कुरबा (45, शिमोगा कर्नाटक) अशी या संशयित चोरटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडील दोन स्क्रू ड्रायव्हर, दोन कटावण्या आदीसह मोबाइल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. ओरोस पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी चारही संशयितांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रत्नागिरीत तीन चोऱया

या चोरटय़ांनी शहरातील मारूती मंदिर येथील महालक्ष्मी मिनी मॉलसह तीन दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे. गुरूवारी 27 सप्टेबरच्या रात्री महालक्ष्मी मिनी मॉलमध्ये शिरून त्यांनी सुमारे दिड हजारांची रोकड लंपास केली. त्याचबरोबर शेजारचे बापट यांच्या दुकानाचे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी नितीन यशवंत लाखण (47, ऱा किल्ला रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकानातील सीसीटीव्ही वरून चौघाजणांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर याच रात्री शहरात आणखी दोन ठिकाणी दुकाने फोडण्यात आली होती.

सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या या चौघांच्या नावानवर विविध राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अनेक राज्यांचे पोलीस त्यांच्या मागावर होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक रविराज फडणीस, देसाई, आंबेरकर, केसरकर, वालावलकर, राणे, तांबे, जाधव, पाटील हे शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना ओरोस फाटा येथे एका दुकानाच्या बाजूला रात्री साडेअकराच्या सुमारास चौघेजण संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले. त्यांची चौकशी करता त्यांच्याकडे चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. त्यामुळे शटर उचकटून चोरी करणारी टोळी असल्याच्या संशयावरून त्यांना लागलीच अटक करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी 27 रोजी रत्नागिरी येथे झालेल्या तीन दुकानांतील चोऱयांची कबुली दिली आहे. तसेच विविध राज्यात चोऱया केल्याचेही कबूल केले असल्याचे सांगण्यात आले.