|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हुश्श… एकदासे भरले ‘चिकोत्रा’

हुश्श… एकदासे भरले ‘चिकोत्रा’ 

सदाशिव आंबोशे/ सेनापती कापशी 

संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिकोत्रा धरण यंदा सात वर्षानंतर  प्रथमच 100 टक्के भरले. चिकोत्रा खोऱयातील प्रत्येक गावात भर पावसाळ्यातच दिवाळीतील आनंदापेक्षाही मोठा आनंद येथील एकूण एक माणसाला झाला आहे.  खऱया अर्थाने आज…….. धरण भरले असले तरी जेव्हा धरणाने 90 टक्क्यांची पातळी पार केली, त्याचवेळेपासून धरण भरणार अशी खात्री झाली आणि बळीराजाच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे. हे धरण 4 सप्टेंबर रोजी 98 टक्के भरले होते. मात्र उर्वरीत 2 टक्के धरण भरण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागला. शुक्रवारी पडलेल्या जोरदार पावसाने हे धरण 100 टक्के भरले आहे. चिकोत्रा भरले अन् शेतकऱयांचा आनंद व्दिगुणीत झाला.

राज्यातील सर्व लहान-मोठी धरणे पुर्ण क्षमतेने केंव्हाच भरली. मात्र 1.52  टीएमसी म्हणजेच 1552 एमसीएफटी क्षमतेचे हे धरण दरवर्षीपेक्षा 1100 मि. मी. जादा पाऊस झाल्यानंतर भरले आहे, हे विशेष…! खरेतर सन 2011 नंतर आठ वर्षांनी प्रथमच चिकोत्रा भरले आहे. 2013 ला धरण 99 टक्क्यावर आले आणि पावसाने दडी मारल्याने आहे तीच पाणी पातळी राहिली. नंतर पाऊसच न झाल्याने धरणातून लवकर पाणी सोडावे लागले. क्रिकेट मधील एखादा खेळाडू 99 धावावर बाद झाल्यासारखी स्थिती धरणाची झाली. मात्र गेल्या तीन वर्षात धरणातील पाणीसाठय़ावर नजर टाकली असता फार गंभीर अवस्था झाली होती.  सन 2015 ला 48 टक्के भरले. तर सन 2016, 17 ला अनुक्रमे 61 व 62 टक्केच भरले. धरणामध्ये पहिल्याच वर्षी म्हणजे 2001 साली केवळ 40 टक्के झाला होता. त्यानंतर 2008 साली प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले होते. 2003 साली धरणामध्ये केवळ 37 टक्के इतकाच निच्चांकी पाणीसाठा झाला होता.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील पाणी कशा पध्दतीने सोडायचे याबाबत पाटबंधारे अधिकाऱयांची चर्चा सुरु आहे. कारण गेल्या आठ वर्षापासून धरण न भरल्याने सांडव्यातून पाणी सोडण्याचा प्रसंगच आला नाही. सांडव्यातून पाणी    नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यासाठी व्यवस्था आहे. पण जादाच पाऊस पडू लागल्यास सांडव्यातील दरवाजे उघडायचे? की मुख्य दरवाजातून पाणी सोडायचे? यावरही अधिकाऱयांची सल्ला मसलत सुरु आहे. मात्र सांडव्यातील दरवाजांचे काम केले आहे. ……………………….

धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने गेल्या तीन वर्षात चिकोत्रा खोऱयातील शेतकरी खूप मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला. कर्ज काढून पाईप लाईन केली आहे. लग्नग्न, मुलांचे शिक्षण व इतर काही कामे ही या उसाच्या जीवावरच धाडसाने  शेतकऱयांनी केली. मात्र गेल्या तीन वर्षात धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने शेतकऱयांची आर्थिक घडीच विस्कटली आहे.

या धरणातील पाण्यावर चिकोत्रा नदीकाठावरील 28 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. तर कितीतरी शेतकऱयांच्या स्वतःच्या शेतीसाठीच्या पाणी योजना आहेत. 3 एचपी पासून ते 20 एचपी पर्यंतच्या खासगी तर एक सहकारी पाणी योजना कार्यान्वीत आहे. तर एका योजनेचे अर्ध्यावरच काम रखडले आहे.

चौकट

1) अडीच हजार मि. मी. पाऊस हवाच….

चिकोत्रा धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात दरवर्षी किमान अडीच हजार मि. मी. पाऊस झाला पाहिजे. तरच धरण भरणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. मागील आठरा वर्षातील झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हेच लक्षात येते की ज्यावर्षी चांगला पाऊस होतो, त्यावेळी धरणात चांगला पाणीसाठा होतो. चिकोत्रा भरले का? असा अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे वॉट्सअपवर हे जगातील सर्वात मोठे धरण आहे का? या पोस्टने तर मोठा विनोद झाला होता. मात्र प्रत्यक्षात हे धरण दीड टीएमसी क्षमतेचे आहे.

2) मेघराजाच धावला बळीराजाच्या मदतीला…

मेघराजाची कृपादृष्टी झाल्याने यंदा खोऱयातील शेतकऱयांचे हाल कमी होणार आहेत. शेवटी शेतकऱयांच्या मदतीला मेघराजाच धावला. अहो… जगाच्या या पोशिंद्याला चिकोत्रा खोऱयात गेल्या तीन वर्षात चोराप्रमाणे वागणूक मिळाली. विजेचे वेळापत्रक तर मनात येईल तसे होते. कधी रात्री 9, 10, 11. 45 तर कधी 12.45 वाजता वीज येत होती. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी रात्रभर नदी-शेतावर मुक्कामालाच होता. धरण भरल्यामुळे आता थोडा तरी त्रास वाचणार आहे. म्हणूनच तर शेतकऱयांनी मनोभावे यंदा मेघराजाला हात जोडून पूजा केली. बारमाही वाहणाऱया नदीकाठावरील शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, हे खरे आहे. मात्र चिकोत्रा खोऱयातील शेतकरी जाम खूष आहे.

3) गळती काढण्यात यश…

चिकोत्रा धरणाच्या मुख्य गेटला प्रथमापासूनच थोडी गळती होती. ज्यावर्षी धरणात पाणीसाठा कमी झाला, त्या-त्यावेळी गळती प्रकर्षाने जाणवली आहे. गतवर्षी धरणात 62 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी प्रचंड संघर्ष झाला. तसेच चिकोत्राचा जुळा भाऊ नागणवाडी प्रकल्प गेल्या आठरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. पुनर्वसनासह प्रकल्प व्हावा अशी मागणी किसान सभेने यंदा लावून धरली होती. त्यांना तालुक्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला होता. दोनवेळा रास्तारोको, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. पण पालकमंत्र्यांनी हुशारीने हा मोर्चा येवू दिला नाही. आणि अद्याप दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही केली नाही.

4) कमकुवत जलस्त्राsत…

कोणतेही धरण भरण्यासाठी त्याठिकाणचे जलस्त्राsत बळकट असावे लागतात. पण चिकोत्रा धरणाचे हे स्त्राsतच कमकुवत आहेत. पाऊस थांबला की धरणात पाणी येण्याचे थांबते. हे धरण भरण्यासाठी काही स्त्राsत निर्माण केले आहेत. दोन वर्षापूर्वी शिवारबा पठारावरील म्हातारीच्या पठारावर वनविभाच्या परवानगीने छोटा बांध घालून पाणी धरणाच्या दिशेने वळविले. त्यावेळी हा चांगलाच मुद्दा कळीचा झाला होता. पण मेघोलीच्या लोकांच्याही लक्षात आल्याने हा प्रश्न निकालात निघाला आहे. यंदा येथून चांगले पाणी येत आहे. तरीही येथे पक्की भिंत बांधून तेथे दरवाजा ठेवून पाणी अडविल्यास मेघोलीही भरेल आणि चिकोत्राकडे उर्वरित सर्व पाणी सोडता येईल. पण फोडलेल्या बांधाची अद्याप दुरूस्ती झाली नाही.   तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोळावीवाडीतील एका कार्यक्रमात आरळगुंडीच्या बाजूनेही चिकोत्रात पाणी वळवण्यासाठी 23 लाख रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. पण त्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नाही.

5) नजरा चिकोत्राकडे….

दररोज सकाळी 8.5 मिनिटांनी चिकोत्रा धरणातील पाणीसाठय़ाची आकडेवारी संबंधित अधिकारी काही जणांच्या वॉट्सअपवर टाकतात. काही क्षणात ही माहिती चिकोत्रा खोऱयात पसरते. चूकुन एखाद्या दिवशी माहिती न मिळाल्यास लगेच पोस्ट पडते. आज चिकोत्रा किती भरले? म्हणजे लोकांचे किती बारीक लक्ष आह,s हे जाणवते. तर धरण भरणार असल्याचा अंदाज आल्यापासून पाहण्यासाठी गर्दी वाढली आहे. जाणारे तरुण मोबाईलवर पाणीमोजमाप पट्टीसह पाणीसाठय़ाची माहिती सोशल मिडियावर फॉरवर्ड करतात. त्यामुळे धरण कधी भरेल अशी स्थिती लोकांची झाली होती. आता धरण भरले म्हटल्यानंतर धरणातील पाण्याची जाणारे लोक मनोभावे पूजा करतात. सहकुटूंब जावून पावसाळी एक दिवसाची सहल करू लागले आहेत.

6) सुरक्षेचा अभाव….

धरण भरल्यामुळे बघण्यासाठी लांबून लोक येत आहेत. या लोकांना विचारणारे कोणीच नाही. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूण चार कर्मचारी आहेत. पण त्यातील दोन निवृत्तीच्या टप्प्यावर आहेत. तर दोघांना हे सर्व सांभाळने अवघड आहे. त्यामुळे धरणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे.

 आजपर्यंत धरणातील पाण्याची टक्केवारी

2001 – 40 टक्के, 2002 – 44 टक्के, 2003 – 37  टक्के, 2004 – 72 टक्के, 2005 – 86 टक्के, 2006 – 86 टक्के, 2007 – 86 टक्के, 2008 – 100 टक्के, 2009 – 76 टक्के, 2010 – 88 टक्के,  2011 – 100 टक्के, 2012 – 78 टक्के, 2013 – 99 टक्के, 2014 – 78 टक्के, 2015 – 48 टक्के, 2016 – 61 टक्के, 2017 – 62 टक्के, 2018 – 100 टक्के.