|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नयनरम्य दूधसागर पर्यटनाचा शुभारंभ

नयनरम्य दूधसागर पर्यटनाचा शुभारंभ 

प्रतिनिधी/ धारबांदोडा

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला काल 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. दूधसागर पर्यटनाला आलेल्या देशी पर्यटकांच्या पहिल्या तुकडीचे स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांच्याहस्ते कुळे येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वनखात्याचे फाटक उघडून पर्यटकांच्या जीपगाडय़ांना  धबधब्याकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला.

कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर, मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी परेश परोब, दूधसागर टूर ऑपरेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष ट्रिपोलो सौझा, उपाध्यक्ष दिलीप मायरेकर, सचिव नरेश शिगांवकर, खजिनदार जानबा लांबोर, असोसिएशनचे सदस्य बॅनी आझावेदो, नंदीश देसाई, संतोष नाईक, जॉन फर्नांडिस, पंच सदस्य निशा शिगांवकर, मच्छींद्र देसाई आदी उपस्थित होते.

साधनसुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न : पाऊसकर

 दूधसागर हे इको टुरिझमच्यादृष्टीने गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथील पर्यावरणाला धक्का न लावता पर्यटन व्यवसाय केला पाहिजे. स्वच्छताही तेवढीच महत्वाचे आहे. या पर्यटन स्थळावरच स्थानिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे धबधब्यावर वाहतूक सेवा देणाऱया जीप गाडय़ांच्या खेपांवर मर्यादा घालू नयेत यासाठी आपले प्रयत्न असतील, असे आमदार दीपक पाऊसकर यांनी सांगितले.

 जीपगाडय़ांच्या खेपांवरच मर्यादा कशाला?

 भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातून रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेच्या रुंदीकरणासाठी मान्यता देण्यात येते. मात्र येथे व्यवसाय करणाऱया जीपगाडय़ांच्या खेपांवर मर्यादा का घालायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दूधसागर पर्यटन स्थळावर आवश्यक साधन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपला प्रयत्न असेल. गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे कुळे येथे दूधसागर नदीत रेंम्पची सोय केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 पर्यावरण सांभाळून पर्यटन करा : परेश परोब

परेश परोब म्हणाले, पर्यटकांना योग्य सेवा देतानाच, जीपगाडय़ाच्या वाहतुकीत  शिस्त बाळगणे महत्वाचे आहे. हे करताना येथील पर्यावरण संवर्धनासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे. पर्यटक हे पाहुणे असल्याने येथील सेवा व आदरातिथ्याची आठवण त्यांच्या मनात कायम राहिली पाहिजे. जे जीप चालक कायद्याचे पालन व शिस्त बाळगत नाहीत अशांवर टूर ऑपरेटर्स असोसिएशनने कडक कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. येथील जीपमालकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी तसेच दूधसागर धबधबा व वन्यक्षेत्राबद्दल त्यांना अधिक माहिती मिळावी यासाठी प्रसारमाध्यमे, विविध खात्यांचे कर्मचारी, तसेच या व्यवसायावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लोकांचा एक मेळावा आयोजित करण्यात यावा. आमदार पाऊसकर यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

खाणींसारखी स्थिती दूधसागर पर्यटनाची होऊ देऊ नका

दूधसागर पर्यटन व्यवसाय शिस्तीत व व्यवस्थितपणे चालावा यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करायला हवेत. वनखात्याच्या व पर्यावरणाबद्दल असलेल्या कायद्याचे व नियमाचे पालन प्रत्येकांनी करावे, असे आवाहन सरपंच मनिष लांबोर यांनी केले. गोव्यातील खाण व्यवसायाप्रमाणे दूधसागर पर्यटन व्यवसायाची स्थिती होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

निशा शिगांवकर यांचेही भाषण झाले. अध्यक्ष ट्रिपोलो सौझा यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नरेश शिगांवकर यांनी तर नंदीश देसाई यांनी आभार मानले. कुळे दूधसागर टूर ऑपरेटर्सच्या कार्यालयाजवळ पहिल्या पर्यटक तुकडीचे गळय़ात पुष्पहार घालून आमदार दीपक पाऊसकर व इतरांनी स्वागत केले. त्यानंतर भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानाचे फाटक उघडून पर्यटकांना प्रवेश देण्यात आला.