|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संवाद मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करणार मोदी

संवाद मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करणार मोदी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

पंतप्रधान नरेंद मोदी लोकांशी थेट संवाद साधण्याच्या स्वतःच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक पाहता पंतप्रधान मोदी या टप्प्यात तरुणाईवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. यांतर्गत ते फेसबुक, ट्विटर आणि अन्य माध्यमातून लोकांशी थेट जोडले जाणार आहेत. सूत्रांनुसार 10 ऑक्टोबरनंतर पंतप्रधान मोदींचा हा प्रस्तावित संवाद कार्यक्रम सुरू होणार आहे.

मागील 3 महिन्यांपासून पंतप्रधान मोदींनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला होता. यांतर्गत 12 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रत्येक कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशाच्या दुर्गम भागातील लोकांशी एकाचवेळी संपर्क साधत होते. या संवाद कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद चांगला असून दुर्गम भागांमध्ये याचा व्यापक प्रभाव दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाला मिळालेल्या प्रतिसादानुसार संवादाच्या या टप्प्याच्या प्रभावाचा राजकीय लाभ देखील मिळू शकतो आणि ब्रँड मोदीला यामुळे आणखीन दृढता मिळाली आहे.

मेरा बूथ सबसे मजबूत

पंतप्रधान मोदी 2019 पूर्वी लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबित आहेत. याच अंतर्गत ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हा कार्यकम देखील राबविला जातोय, यात मोदी एखाद्या लोकसभा मतदारसंघाच्या बूथ प्रतिनिधींशी थेट संवाद साधत आहेत. आतापर्यंत 10 लोकसभा मतदारसंघांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी चर्चा केली आहे.

व्हॉट्सऍपवर अधिक भर

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार करणे आणि लोकांपर्यंत स्वतःचे म्हणणे पोहोचविण्यासाठी व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर व्हावा अशी सूचना मोदींनी भाजप नेत्यांना केली आहे. शासकीय योजनांपासून पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचावेत याकरता व्हॉट्सऍपला मुख्य स्रोत करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. संवादाच्या लढाईत व्हॉट्सऍप सर्वात महत्त्वाचे ठरल्याचे विधान मोदींनी पक्ष नेत्यांना उद्देशून केले आहे.