|Sunday, August 25, 2019
You are here: Home » leadingnews » युती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी लोकसभा आणि विधनसभा निवडणूक स्वबळावर लढवू, असे शिवसेनेने म्हटले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत महत्त्वपूर्ण विधन केले आहे. भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधरा समानच आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेला युतीसाठी साद घातली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. फडणवीस म्हणाले, युती तुटल्याचे परिणाम दोन्ही पक्षांवर होतील.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि भाजपा – शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर मतांचे विभाजन होईल. याचा फायदा आघाडीला होईल आणि शेवटी भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीतच दोन्ही पक्षांचा फायदा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. आमचा दोन- तीन जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज आहे. शेवटी शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

शिवसेनेला युतीसाठी कसे तयार करणार असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणतात, राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे युतीबाबतही हे शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले