|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » धनगर समाजबांधवांचा सिंधुनगरीत एल्गार

धनगर समाजबांधवांचा सिंधुनगरीत एल्गार 

आरक्षणाशिवाय माघार नाही! : शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या : जयघोषाने परिसर दणाणला पारंपरिक वेशभूषा, ढोलताशे आणि शेळय़ा-मेंढय़ांचाही समावेश आरक्षण लागू न करणे ही धनगर समाजाची क्रूर चेष्टा!

प्रतिनिधी / ओरोस:

 आरक्षण देण्याचे अभिवचन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने सत्तेची चार वर्षे उलटली, तरी आरक्षण लागू न करणे ही धनगर समाजाची क्रूर चेष्टा आहे. या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठला असून ‘आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही’, असा इशारा देत सिंधुदुर्गातील शेकडो धनगर समाजबांधव मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

 पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांसह गजानृत्य आणि शेळय़ा-मेंढय़ांसह ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने या बांधवांनी सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून सोडला. ‘उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, अशा घोषणाही देण्यात आल्या. येथील रवळनाथ मंदिरात मोर्चापूर्वी देवासमोर घालण्यात आलेले गाऱहाणेही लक्षवेधी होते. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ‘धनगर’ शब्दाचा नामोल्लेख ‘धनगड’ असा झाल्याने आरक्षणाचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱया शासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

‘धनगड’ शब्दाचा पाडला जातोय कीस

 राज्य घटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात स्थान दिले आहे. त्याआधारे अन्य राज्यांमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्राने ‘धनगड’ या शब्दाचा कीस पाडत मागील 68 वर्षे या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. तत्कालीन शासनाप्रमाणेच या शासनानेही फसवणूक केल्याने शासनाचा निषेध करण्यात आला.

मंत्र्यांकडून खोटे प्रतिज्ञापत्र

 2014 साली या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या धनगर समाजाला सत्तेत आल्यानंतर लगेचच आरक्षण लागू केले जाईल, अशी ग्वाही भाजप नेत्यांनी दिली होती. या समाजाची मते घेत सत्तेवर विराजमान झाल्यानंतर मात्र शासनाने या मुद्याकडे डोळेझाक केली आहे. आरक्षणाच्या मुद्यासाठी शासनाने ‘टीस’ नावाची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. शासनाच्या या भूमिकेवरही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंत्र्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचा आरोपही शासनावर करण्यात आला आहे.

आरक्षण तात्काळ लागू करावे

 अद्यापही सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्टय़ा प्रवाहासोबत आणण्यासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गरज असून ते तात्काळ लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेकडो समाज बांधवांचा सहभाग

 सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीचे मुख्य संघटक सुरेश झोरे, कानू शेळके, किशोर वरक, संतोष पटकारे, सूर्यकांत बोडके, संतोष साळसकर, बाबू हुंबे, विलास जंगले यांच्यासह शेकडो समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.

मोर्चा ठरला हटके

 ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चा दरम्यान गजानृत्य प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच जुनेजाणते धनगर बांधव पारंपरिक वेशभूषेतच यामध्ये सामील झाले होते. बकऱया व शेळय़ांचाही यामध्ये समावेश असल्याने मोर्चा हटके ठरला.

Related posts: