|Monday, December 10, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » यंदाचा ‘स्वरोत्सव’ महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात ; रमणबागेतील परंपरा खंडित

यंदाचा ‘स्वरोत्सव’ महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात ; रमणबागेतील परंपरा खंडित 

पुणे / प्रतिनिधी :

आर्य संगीत प्रसारक मंडळाकडून आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा येत्या 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती बुधवारी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

गेली 32 वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत होता. त्याआधी तो रेणुका स्वरूप येथे होत असे. यंदा सोसायटीने रमणबाग शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे महाराष्ट्रीय मंडळ येथे महोत्सव होत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या सगळय़ांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करीत असल्याचे जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळय़ा भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले. महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे अगत्याने मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत. हा महोत्सव दरवषीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली 65 वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले. तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वासही श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Related posts: