|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » स्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात

स्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात 

आंबेनळी अपघातातील बसचा सांगाडा दापोलीत

बसचा टपही दरीबाहेर काढण्याची मागणी

प्रतिनिधी /दापोली

आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बसचा सांगाडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वाहन विभागात ठेवण्यात आला आहे. मात्र तपासातील महत्वाचा भाग ठरू शकणारा स्टेअरींगवलील हाताच्या ठशांचा पुरावा शिल्लक राहिला नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. दरम्यान, या गाडीचा टपही दरीबाहेर काढण्याची मागणी होत आहे.

28 जुलै रोजी कोकण कृषी विद्यापीठाची बस पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर असणाऱया आंबेनळी घाटातील दरीत कोसळून 30 कर्मचाऱयांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंतदेसाई हेच ही बस चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यासाठी बसच्या स्टेअरींगवरील ठसे घेण्याची मागणी झाली होती. यामुळे ही बस दरीतून बाहेर काढल्यावर अपघातातील अप्रकाशित सत्य बाहेर येणार का याकडे मृतांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून राहिले होते.

केवळ सांगाडा

विद्यापीठाने गेल्या शनिवारी ही बस दरीतून बाहेर काढून दापोलीतील नर्सरी रोडवरील वाहन विभागात ठेवली आहे. या बसचा कोणताही भाग सुस्थितीत नसून केवळ सांगाडा शिल्लक आहे. ही बस दरीतून बाहेर काढण्यासाठी ठराविक वेळ निशिचत करण्यात आली होती. या मुदतीत केवळ चेसी बाहेर काढण्यात यश आले. यानंतर वाहतूक सुरू करण्यात आल्याने बसच्या वरील भाग दरीतून बाहेर काढण्यात आलेला नाही. हा टप बाहेर काढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वाहन विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.

टप बाहेर काढण्याची मागणी

या टपाला जोडून गाडीच्या चालकाच्या बाजूचा दरवाजा अद्याप दरीत पडून आहे. या दरवाजाच्या हॅन्डलवर जो व्यक्ती या दारातून शेवटी गाडीत चढला किंवा गाडीतून उतरला त्याच्या हातांचे ठसे असू शकतात असे यातील जाणकारांचे म्हणणे आहे. यासाठी हा टप बाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे. कारण गाडीच्या स्टेअरिंगवर बोटांचे ठसे मिळतील असे अनेकजणांचे म्हणणे होते. मात्र गाडीचे स्टेअरिंग अपघातात उलटे फिरले असल्याने व ते रबराचे बनलेले असल्याने त्यावर ठसे मिळणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या गाडीतील सीट या एकमेकांमध्ये घुसल्याने गाडीतील प्रवाशांचे काय झाले असेल याच्या कल्पनेनेच हा गाडीचा सांगाडा पाहणाऱयांच्या अंगावर शहारे आले. चालकाची सीट तर आपली जागा सोडून डाव्या बाजूला तुटून पडली आहे. गाडीची चेसी एल आकारात वाकली, असल्याची माहिती वाहन विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.