|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मात

भारताची बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मात 

सुलतान जोहोर चषक हॉकी विद्यमान विजेत्यावर 5-4 गोल्सनी मात

वृत्तसंस्था / जोहोर बाहरू, मलेशिया

भारताच्या कनि÷ हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवताना विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियावर 5-4 अशी मात केली. या विजयाने भारताचे उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित झाले आहे.

भारताने प्रारंभापासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवले. सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदवण्यात अपयश आले असले तरी गुरसाहिबजित सिंगने पाचव्याच मिनिटाला शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले. या गोलने प्रेरित झाल्यानंतर भारताने 11, 14 व 15 व्या निनिटाला पाठोपाठ तीन गोल नोंदवत ऑस्ट्रेलियावर 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली. हसप्रीत सिंग, मनदीप मोर, विष्णुकांत सिंग यांनी हे गोल नोंदवले. अशा प्रकारे पहिल्या सत्रावर भारताने हुकूमत राखत एकतर्फी आघाडी घेतली होती.

मात्र दुसऱया सत्रात भारतीय संघ बचाव करण्यात कमी पडला आणि 18 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल बहाल केला. डेमन स्टीफेन्सने ऑस्ट्रेलियाचा हा पहिला गोल नोंदवल्यानंतर दुसरा गोलही त्यानेच नोंदवला. सर्कलच्या आत भारताकडून फाऊल झाल्याने ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि 35 व्या मिनिटाला त्यावर स्टीफेन्सने गोल नोंदवत भारताची आघाडी 2-4 अशी कमी केली. 43 व्या मिनिटाला शिलानंद लाक्राने गोल नोंदवून भारताची आघाडी 5-3 अशी वाढविली असली तरी ऑस्ट्रेलियाने जोरदार आक्रमण करीत भारतावर दडपण आले. आघाडी टिकवून ठेवण्याच्या दडपणामुळे 59 व्या मिनिटाला भारताने आणखी एक पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्यावर स्टीफेन्सने गोल नोंदवून भारताची आघाडी 5-4 अशी कमी केली. ऑस्ट्रेलियाने बरोबरीसाठी खूप धडपड केली. पण भारताने निसटती आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय साकार केला. भारताची पुढील लढत ब्रिटनविरुद्ध 12 रोजी होणार आहे. भारताचा हा पाचवा सामना असेल.