|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘यशवंत’ मध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम

‘यशवंत’ मध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम 

प्रतिनिधी/ सांगली

 राज्य शासनाच्यावतीने गतिमान प्रशासन राबविण्यासाठी घेण्यात येणाऱया यशवंत राज अभियान योजनेत सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे. तर शिराळा पंचायत समिती राज्यात तिसरी आली आहे. सांगली जिल्हा परिषदेने 12 वर्षानंतर हे नेत्रदीपक यश मिळविले आहे. यापूर्वी हागणदारीमुक्त अभियानात राज्यात सांगली जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी राज्यस्तरीय यश मिळविले होते. सलग दुसऱयावर्षी राज्यस्तरावर सांगलीचा नावलौकिक वाढला आहे. त्यामुळे सांगलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 26 ऑक्टोबरला मुंबईत भव्य दिव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

 जिल्हा परिषद सांगलीने विभागीय स्तरावर चांगले गुण मिळविले होते. सांगलीची राज्यस्तरावर स्पर्धा ही सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेबरोबर होती. पण, राज्यस्तरीय तपासणी करणारी समिती आल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेने आपला दर्जा आणि कार्यकर्तृत्व आणखीन वाढवले. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचे गुणांकन हे सिंधूदुर्गपेक्षा वाढले. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेला हे राज्यस्तरीय यश मिळाले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानाचा विभागस्तरीय निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये पुणे विभागात सांगली जिल्हा परिषद 78.75 टक्के गुण प्रथम स्थानावर आली होती. तसेच पंचायत समितीमध्ये शिराळा पंचायत समिती 93.25 टक्के गुण मिळवत विभागात प्रथम आली होती. त्यामुळे  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिराळा पात्र ठरले होते. कोणत्याही परिस्थितीत राज्यस्तरीय समितीसमोरही अतिशय चांगल्या पध्दतीने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून या समितीसमोर अहवाल ठेवण्यात आला तसेच कोणताही गुण जावू नये, याची दक्षता घेण्यात आली. याचा लाभ जिल्हा परिषद सांगली आणि शिराळा पंचायत समिती या दोघांनाही झाला आहे.

राज्य शासनाच्यावतीने गतिमान प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी यशवंत पंचायत राज अभियान 2005-06 या आर्थिक वर्षापासून राबविले जाते. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कारभाराची संपूर्ण माहिती घेतली जाते. तसेच राज्य व केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या योजना किती प्रभावीपणे राबविल्या जातात याची प्रत्यक्ष घटनास्थळी जावून तपासणी केली जाते. त्यानंतर या तपासणीची आणि जिल्हा परिषदेने प्रत्यक्ष दाखविलेल्या कामांची छाननी आणि तपासणी करून हे गुणांकन दिले जाते. यामध्ये सांगली जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.

गतिमान प्रशासनामुळेच यश : संग्रामसिंह देशमुख

जिल्हा परिषदेने आपली कार्यक्षमता वाढविली आहे. तसेच कागदपत्रे आणि गतिमान प्रशासनाची जी नीतीमूल्ये आहेत ती योग्य प्रकारे राबविण्यात आली. त्यामुळे त्याचा लाभ सांगली जिल्हा परिषदेला मिळाला. विभागीय स्तरावरील तपासणीनंतर राज्यस्तरीय समितीपुढे जात असताना आपले गुण कसे वाढतील, याचा आढावा आम्ही सातत्याने घेतल्याने हे गुण वाढले आहेत. पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद प्रशासन आणि कर्मचाऱयांच्या एकत्रित परिणामामुळे हे यश मिळाले असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.

टीमवर्कमुळेच हे यश मिळवू शकलो : दीपाली पाटील

यशवंतराज पंचायतमध्ये सांगली जिल्हा परिषेचा बारा वर्षानंतर प्रथम क्रमांक आला आहे. हे यश सर्व विभागाचे आणि टीमवर्कचे आहे.  आम्ही राज्यात प्रथम येण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे स्वयंमूल्यांकन करून घेतले होते. या स्वयंमूल्यांकनामुळे आम्हाला आत्मविश्वास आला आणि आपण राज्यात यशस्वी होणार हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे राज्यस्तरीय समितीसमोर आमचे सादरीकरण केले आणि आम्हाला हे राज्यस्तरीय यश मिळाले, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी सांगितले.