|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक

मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील केवळ आठ मंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून 12 रोजी मुख्यमंत्री दिल्लीतील ‘एम्स’ इस्पितळात या सर्व मंत्र्यांशी खातेवाटपाबाबत चर्चा करणार आहे. मगो पक्षाचे नेते व साबाखामंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे नेते व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई तसेच महसूलमंत्री रोहन खंवटे व कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि भाजपच्या चार मंत्र्यांना   दिल्लीला बोलावले आहे.

सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो व गोवा फॉरवर्डचे प्रमुख नेते तथा मंत्री व दोन अपक्ष मंत्र्यांना या बैठकीला आमंत्रित केले आहे. घटक पक्षाच्या अन्य मंत्र्यांना बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही. भाजपचे चार मंत्री नीलेश काब्राल, मिलिंद नाईक, माविन गुदिन्हो व विश्वजित राणे यांनाही दिल्लीला बोलावले आहे. भाजपच्या गाभा समितीलाही दिल्लीत बोलावले आहे. मुख्यमंत्री खातेवाटपासंदर्भात शुक्रवारी या मंत्र्यांशी चर्चा करतील. मात्र प्रत्यक्ष खातेवाटप नंतरच होणार आहे.

12 रोजी दिल्लीत बैठक होणार असल्याने मंत्र्यांनी अन्य कोणतीही महत्त्वाची कामे या दिवशी ठेऊ नये, अशी सूचना मंत्र्यांना मिळाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच गोव्याबाहेर आणि तीसुद्धा इस्पितळात होणार अशी चर्चा सुरु झाल्यानेच ठराविक मंत्र्यांनाच दिल्लीत बोलावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.