|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शॉर्टसर्किटने 23 एकरातील ऊस खाक

शॉर्टसर्किटने 23 एकरातील ऊस खाक 

शॉर्टसर्किटने 23 एकरातील ऊस खाक

वार्ताहर/   एकसंबा

एकसंबा-अंकली मार्गावरील 20 एकरातील तर बारवाड येथील 3 एकर क्षेत्रातील उसाला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत 11 शेतकऱयांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कुमार महंत, आंता महंत, कृष्णा लट्टे, अंकुश खोत, कृष्णा शिंदे, बाळासाहेब मुल्ला, बाळू सांगावे, विश्वनाथ माळी तसेच बारवाडचे बाळासो गुरव, मांगूरचे राजाराम जळणे अशी नुकसानग्रस्त शेतकऱयांची नावे आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील एकसंबा-अंकली मार्गावरील 20 एकरातील उसाला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास  शॉर्टसर्किटने आग लागली. सदर घटना शेजारच्या शेतकऱयांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती संबंधित शेतकऱयांना कळविली. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी बंब दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले. उसाला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दिसत होते. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

बारवाड येथील तीन एकरातील ऊस खाक

मांगूर : मुख्य तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटने तीन एकरातील ऊस खाक झाल्याची घटना बारवाड येथे बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. यामध्ये बाळासो शंकर गुरव यांचा दोन एकर व मांगूर येथील राजाराम जळणे यांचा 1 एकरातील ऊस खाक झाला असून सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बारवाड-रेंदाळ रस्त्यानजीक बाळासो गुरव, मांगूरचे राजाराम जळणे यांच्यासह बारवाड व मांगूर येथील बऱयाच शेतकऱयांच्या जमिनी आहेत. या सर्वच जमिनीत उसाचे पीक घेण्यात आले आहे. या सर्व शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी या शेतीतून मुख्य असलेल्या विद्युत वाहिनीचे खांब घातले आहेत. त्यातील तारांमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. 

वाऱयाच्या वेगामुळे आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. परिसरातील अन्य पिकाला आग घेरणार हे लक्षात येताच अन्य शेतकऱयांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जळणे यांच्या शेताशेजारी असणारा ऊस त्वरित तोडण्यात आल्याने केवळ तीन एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग आटोक्यात आणण्यासाठी जवाहर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

जीर्ण विद्युततारा बदलण्याची मागणी

बारवाड व परिसरातील शेती शिवारातून जोडण्यात आलेल्या विद्युत तारा बऱयाच वर्षापूर्वीच्या असल्याने त्या जीर्ण व कमकुवत झाल्या आहेत. त्या बदलण्याची मागणी होत आहे. पण त्याकडे हेस्कॉमने दुर्लक्ष केले आहे. शॉर्टसर्किटने ऊस जळण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याचा फटका शेतकऱयांना बसत आहे. या समस्येची दखल घेत त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Related posts: