|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळचा ‘कोकणकन्या बँड’ ठरला ‘संगीत सम्राट’

कुडाळचा ‘कोकणकन्या बँड’ ठरला ‘संगीत सम्राट’ 

झी युवा वाहिनीवरील कार्यक्रमात विजेतेपदाला गवसणी : सिंधुदुर्गातून अभिनंदनाचा वर्षाव

वार्ताहर / नेरुर:

 झी युवा वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ पर्वात कुडाळ-सिंधुदुर्गच्या ‘कोकणकन्या बँड’ ग्रुपने दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर महाअंतिम फेरीत विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरत चषक व तीन लाखांचे बक्षीस पटकावले. परीक्षक गायक आदर्श शिंदे व गायक राहुल देशपांडे यांचा विश्वासही त्यांनी सार्थ ठरविला. या यशाबद्दल जिल्हाभरातून या ग्रुपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 कुडाळ शहर परिसरात संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले विवेक कुडाळकर व त्यांची पत्नी सौ. तृप्ती कुडाळकर या दांपत्याची मोठय़ा वाहिनीवर एकदा तरी आपली कला पेश करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गायक सागर कुडाळकर, गायिका रसिका भिडे, कांचन चिंतामणी, साक्षी मराठे, हार्मोनियम वादक दिशा देठे, किबोर्ड वादक दिनेश वालावलकर, गिटार वादक गौरी तिडके, पखवाज-ढोलकी-तबला वादक गौरव पिंगुळकर अशा होतकरू युवा कलाकारांना कोकणकन्या बँडच्या झेंडय़ाखाली एकत्र आणले. या सर्वांची गुणवत्ता हेरून मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार रविराज कोलतडकर यांनी या सर्वांचा आत्मविश्वास वाढविला. त्यातूनच विविध ढंगी व एकापेक्षा एक नजराणे ‘संगीत सम्राट’च्या पर्वात या ग्रुपने सादर केले. परीक्षक आदर्श शिंदे व राहुल देशपांडे यांनी अनेकवेळा त्यांना ‘भले शाब्बास’ची कौतुकाची थाप रंगमंचावर जाऊन दिली.

 परीक्षकांची कौतुकाची थाप, संगीतकार कोलतडकर यांचे मार्गदर्शन व सिंधुदुर्गातील रसिकांचे आशीर्वाद या जोरावर या ग्रुपने संगीत सम्राटच्या महाअंतिम फेरीत धडक मारत विजेतेपदाच्या चषकाला गवसणी घातली. उपस्थित रसिकांनी टाळय़ांच्या कडकडाटात या ग्रुपचे अभिनंदन केले. चषक आणि रोख तीन लाख रुपयांचे बक्षीस देऊन या ग्रुपला गौरविण्यात आले.

 सिने अभिनेता पुष्कर श्रोत्री, गायिका वैशाली सामंत, गायक आनंद शिंदे व आदर्श शिंदे, राहुल देशपांडे उपस्थित होते. ‘आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. हा सुखद क्षण मनाच्या कुपीत कायम साठवून ठेवण्यासारखा आहे’ अशी प्रतिक्रिया या ग्रुपचे विवेक कुडाळकर व तृप्ती कुडाळकर यांनी व्यक्त केली.