|Friday, August 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सत्य संकल्पाचा दाता भगवंत

सत्य संकल्पाचा दाता भगवंत 

अक्रूराच्या मनातील विचारचक्राबाबत चिंतन मांडताना भागवताचार्य वै. डोंगरे महाराज पुढे म्हणतात-पवित्र विचार करीत राहण्यानेच जीवन सफल होत असते. माझ्याजवळ इतके पैसे आहेत, आता इतके आणखी एकत्रित झाले म्हणजे मोटर ठेवीन. दोन वर्षे चांगला धंदा चालला तर बंगला बांधेन. याप्रमाणे सुखोपभोगाचे विचार करणाऱयांची आत्मशक्ती नष्ट होऊन जाते. पवित्र विचारच जीवन सुधारू शकतात. सर्वांचेच आपल्या मनासारखे नाही, तर ईश्वराच्या इच्छेसारखे होत असते. पवित्र विचार केल्याने-प्रभूवर प्रेम केल्याने हृदय पवित्र होत असते. आपल्या मनाने नेहमी शुभ आणि सत्य संकल्प करावे. कोणाचेही वाईट चिंतू नका. सगळय़ांचेच भले चिंता. (विश्वकल्याणाचे संकल्प आपण नेहमी करावे ते असे- सर्वांसी सुख लाभावे। तशी आरोग्य संपदा । कल्याण व्हावे सर्वांचे । कोणी दु:खी असो नये ।। जीवन विद्या मिशनचे प्रवर्तक वामनराव पै यांनी साधकांसाठी सुंदर प्रार्थना सांगितली आहे-हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्याच्या ठेव. सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे! ) भगवंत शुभसंकल्प आणि शुभविचार पूर्ण करीत असतात.  (तुकाराम महाराज सांगतात- सत्य संकल्पाचा दाता भगवंत । सर्व पूर्ण करी मनोरथ ।।) वेदांत संकल्पांचा निषेध करतो. संकल्प रहित होणे फार कठीण आहे. म्हणून संत भक्तिमार्गाचा पुरस्कार करताना, भगवंतासाठी संकल्प करायला सांगत असतात. अक्रूरांना वाटत आहे कीं कृष्ण आपल्याला नाव घेऊन हाक मारतील कीं नाही? तसा तर मी पापी आहे, अधम आहे, पण वयोवृद्ध आहे. वसुदेवाचा चुलतभाऊ पण आहे आणि मित्रही आहे. तेव्हा कदाचित कृष्ण मला काका म्हणून हाक मारील. जर तो मला काका म्हणून उठा बसायला सांगेल तरच मी उठेन बसेन. त्याने जर मला काका म्हटले तर माझा जन्म सफल होऊन जाईल.

भगवंत ज्याचा आदर करणार नाहीत त्याचा जन्म व्यर्थ आहे. जीवमात्र मनाचा उपाशी आहे. जगाच्या गोष्टींकडे ध्यान देऊ नका. कोणी प्रशंसा केली तर सद्भाव जागृत होईल, कोणी कटु बोलेल तर कुभाव. म्हणून लोकांच्या म्हणण्याची चिंता सोडून भगवान काय म्हणतील असा विचार करीत राहा. भगवंत आमच्याकडून सद्भावाची अपेक्षा करतात.

ईश्वराशी काही ना काही संबंध जोडावाच लागेल. (अक्रूर भगवंताशी काका पुतण्या हे नाते सांगतो. देव आणि भक्त हे प्रमुख नाते वेगवेगळी रुपे घेते. संतांनी परमात्म्याशी वेगवेगळी नाती जोडलेली आपण पाहतो. मीराबाईला तो आपला प्रियकर किंवा पती वाटतो. द्रौपदीला तो आपला सखा वाटतो. यशोदेला तो आपला पुत्र वाटतो. तर कंसादिकांना तो आपला शत्रु वाटतो. तुकाराम महाराज एका अभंगात वर्णन करतात-विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ।)

Ad.  देवदत्त परुळेकर