|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डेंग्यू सदृश ताप पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट

डेंग्यू सदृश ताप पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट 

वार्ताहर / मालवण:

वायरी भूतनाथ वराडकरवाडी येथील नीता चंद्रकांत साळुंखे (52) यांचा रविवारी डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाल्यानंतर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वायरी भूतनाथ येथे आरोग्य विभागाच्या पाच पथकांमार्फत पुढील सात दिवस दैनंदिन ताप रुग्ण सर्व्हेक्षण सुरू राहणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पंचायत समिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सभापती सोनाली कोदे, डॉ. श्यामराव जाधव, डॉ. एस. एस. साळकर आदि उपस्थित होते.

पराडकर म्हणाले, डेंग्यू सदृश तापसरीच्या पार्श्वभूमीवर वायरी भूतनाथ येथे 12 ऑक्टोबरपासून दैनंदिन गृहभेट व ताप रुग्ण सर्व्हेक्षण करण्यात आले होते. मयत नीता साळुंखे यांच्या कुटुंबातील 12 जणांचे रक्त नमुने तपासणीकरिता घेण्यात आले तसेच दोन किरकोळ तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दक्षता घेतली जात आहे. तापसरीची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा.

तापसरीच्या रुग्णांमध्ये वाढ

डॉ. बालाजी पाटील म्हणाले, सध्या ग्रामीण रुग्णालयात वायरी भूतनाथ व दांडी येथील तापसरीचे रुग्ण दाखल झाले आहेत. ताप, डोकेदुखी, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम शरीरातील अवयवांवर होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

Related posts: