|Friday, August 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

महाष्टमी -विजयादशमीचे महत्व

बुध.  दि. 17 ते 23 ऑक्टोबर 2018

नोकरी, व्यवसाय, इतरत्र स्थलांतर, दगदग, धावपळ, कामाचा ताण यासह अनेक व्यावहारिक अडचणांमुळे नवरात्रात इच्छा असूनही घराण्यातील कुलाचार पाळता येत नाहीत, पण ते सोडताही येत नाहीत. अन्यथा पुढे त्याचा त्रास होण्याची शक्मयता असते. त्यासाठी नवरात्रातील महाष्टमीला देवी पूजन अवश्य करावे. या दिवशी कोटय़वधी योगिनींसह महालक्ष्मी भूतलावर अदृश्यरुपाने अवतरते. या महालक्ष्मीचे पूजन या अष्टमीला केल्यास घराण्यात कायम समृद्धी नांदते. लक्ष्मीला अभिषेक कुंकुंमार्चन पूजाअर्चा, दुर्गासप्तशतीचे  पाठ, श्रीसुक्त हवन, महाष्टमीच्या निमित्ताने उपास, लक्ष्मीस्तोत्र वाचन, यापैकी जे जमेल ते या अष्टमीला करावे. लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्याचा हा राजमार्ग आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजेला जे महत्त्व आहे, त्याच्या हजारोपटीने अधिक महत्त्व या अष्टमीला आहे. दुर्गसप्तशती पाठ संस्कृतमध्ये  आहे. ते सर्वाना जमेलच असे नाही. त्यासाठी मराठी व कन्नडमध्ये असलेले ‘देवी महात्म्य’ हे पुस्तक वाचले तरीही त्याचे चांगले फळ मिळते. अग्निकर्म व स्थंडीलकर्म जमत नसेल तर सहस्त्रनाम स्वाहाकार मंत्राने विशिष्ट पद्धतीने साधा होम केला तरी ते लक्ष्मीची प्रसन्नता लाभण्यास सहाय्यक ठरते. या महाष्टमीच्या रात्री जागरण केल्यास  चांगले. येत्या 17 ऑक्टोबर रोजी महाष्टमी व त्याच दिवशी खंडेनवमी आहे. या दिवशी आपले वाहन,  रहाती जागा तसेच ज्यातून आपली उपजिविका चालते अशा सर्व वस्तू, मशिनरी, कॉम्प्युटर्स, अवजारे पुस्तके यांची पूजा करावी. त्यामुळे सरस्वती प्रसन्न होते व लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मार्ग मोकळा होतो. नोकरी उद्योगधंद्यातून प्रगती होऊ लागते. विद्यार्थ्यांनी तरी या दिवशी खंडेनवमीची पूजा अवश्य करावी. गुरुवारी 18 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. श्रवण नक्षत्र व दशमीचा योग दुपारी 3.29 पासून सुरू होतो. त्यामुळे खरी विजयादशमी दुपारीच सुरू होते. श्रवण नक्षत्र व दशमी जोपर्यंत आहे, तोपर्यंतच  विजयादशमीचे महत्त्व असते. रामाने रावणावर दशमीच्या मुहूर्तावर विजय मिळविला म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण व 64 कला जाणणारा विद्वान तपस्वी होता. साऱया नवग्रहांना पालथे घालणारा व प्रखर शिवभक्त होता. मनाने तो वाईट नव्हता. पण सीता स्वयंवराच्यावेळी शिवधनुष्य न पेलता आल्याने त्याचा अपमान झाला व त्यातूनच त्याच्या मनात सुडबुद्धी निर्माण झाली. त्यातूनच पुढील रामायण घडले. रामाने रावणाच्या सूडबुद्धीचा नाश केला. पण त्याची विद्वत्ता, भक्ती, हुशारी व तपोबल यामुळे साक्षात विष्णूनेही रामाच्या रुपाने रावणाच्या अंतिम क्षणी उपस्थित राहून त्याला नमस्कार केला, अशा आख्यायिका आहेत. या दिवशी सर्व तऱहेच्या अनिष्ट बाबींवर मात करून जीवन सुखासमाधानाने व्यतित करावे, असा संदेश हा सण देत असतो. या दिवशी एखाद्या श्रीमंत सतशिल निर्व्यसनी व्यक्तीने आपटय़ाची अथवा शमीची पाने दिल्यास ती जपून ठेवावी  व त्याची वर्षभर पूजा करावी. मोठय़ा प्रमाणात पैसा खेचून आणण्याचे सामर्थ्य त्या पानात असते. पण त्याचबरोबर सर्व तऱहेची व्यसने व कपट कारस्थान यांचा त्याग करून स्वत:देखील वर्षभर कष्ट व परीश्रम करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. नुसती आपटय़ाची पाने ठेवून लक्ष्मी येणार नाही 23 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. त्यादिवशी रात्री लक्ष्मी पूजन करून जागरण करावे.

मेष

‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ ही उक्ती तुमच्या बाबतीत या सप्ताहात खरी ठरेल.  अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील. योग्य व तार्कीक विचारसरणीमुळे तुमचे मुद्दे खोडणे काहीजणांना कठीण जाईल. पण शेजारी, नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही. एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.


वृषभ

गुरु अनुकूल आहे. कुणाचाही विरोध सहज मोडून काढाल. काही जुनाट आजारावर कायमस्वरुपी मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले. अन्यथा नको ते आरोप येऊ शकतील. बाधिक दोष, विषारी किटक, सर्पदंश यापासून धोका. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील. एखाद्याला सल्ला द्यायला जाऊन संकटात पडाल. पोलीस केसेसपासून जपा.


मिथुन

गुरुची शुभ दृष्टी दशमावर आहे. नोकरी व्यवसायात उर्जितावस्था येऊ लागेल. हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल, पण मित्रमंडळींच्या सल्ल्यापासून दूर रहावे, अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात  उत्तम योग. पोटात व कंबरेत काही तरी होत आहे, असे सतत वाटत राहील. प्रवास घडतील.


कर्क

गुरु पाचवा आहे. अत्यंत शुभ योग, मोठमोठे उद्योग धंदे, नोकरी यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. सर्व बाबतीत यश देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. लांबचे प्रवास, सहली, टाळण्याचा प्रयत्न करा.


सिंह

वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उdभवतील. सहज केलेली चेष्टा, थट्टामस्करी, अंगलट येईल. काळजी घ्यावी. प्रवासात त्रास. कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल त्यात दैवी साहाय्याचा भाग राहील. काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. कुणालाही शब्द देताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या.


कन्या

पराक्रमातील गुरुमुळे दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर ईशान्येला असेल तर निश्चितच या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी होतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.


तुळ

धनस्थानातील गुरुमुळे आर्थिक स्थिती सुधारू लागेल. अनेक किचकट प्रश्न या आठवडय़ात सुटतील. धनलाभाच्या दृष्टीने वर्षभर अनुकूल योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. भाग्योदयास सुरुवात होईल, पण एखाद्याचे  भले करण्यास जावे तर त्यानेच आपल्यावर नको ते आरोप घालावेत, असे प्रकारही घडण्याची दाट शक्मयता. स्वत:चा बचाव करून इतरांना सहाय्य करा.


वृश्चिक

गुरु, चंद्र गजकेसरी राजयोग होत आहे. आगामी दोन वर्षापर्यंत त्याची चांगली फळे मिळतील. अचानक धनलाभ, विवाह, संतती प्राप्ती अथवा संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ. नवनव्या कार्यक्षेत्रात, प्रवेशाच्या दृष्टीने वर्षभर चांगले योग पण वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल.


धनु

राशीस्वामी गुरु बदलामुळे आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव वाढेल. वर्षभर सतत काही ना काही दैवी अनुभव येत राहतील. काही जणांच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक, पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश. अनेक महत्त्वाचे जटिल प्रश्न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील.


मकर

गुरु लाभस्थानी म्हणजे एक प्रकारचा गडगंज श्रीमंती योग. आतापर्यंत खोळंबलेले आर्थिक व्यवहार मार्गस्थ होतील. सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. सांसारिक सौख्यात वाढ होईल न जुळणारे लग्न ठरेल. काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. एखादा गंभीर रुग्णाला मदत करण्याची वेळ येईल.


कुंभ

दहावा गुरु नोकरी व्यवसायात चांगले बदल घडवील. माता पित्यांच्या बाबतीत सौख्यदायक वातावरण. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व कठीण कामात यश. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. दिवाळीपर्यंतच्या पंधरवडय़ात महत्त्वाच्या घटना घडवील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभ वार्ता ऐकू येईल.


मीन

गुरु भाग्यात हा अत्यंत शुभयोग आहे. धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद असतील तर ते कमी होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी, नोकरवर्गात काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक.