|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केंद्रीय पुरस्काराची मानकरी ठरली बेळगावची कार्यकर्ती

केंद्रीय पुरस्काराची मानकरी ठरली बेळगावची कार्यकर्ती 

गिरीश कल्लेद / बेळगाव :

कुपोषित बालकांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बालकांमधील कुपोषितपणा दूर करण्यासाठी महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरात ‘पोषण माह-2018’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावच्या अंगणवाडी कार्यकर्त्या भारती अण्णिगेरी यांना ‘पोषण माह पुरस्कार’ सन्मान प्राप्त झाला आहे. बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात अण्णिगेरी यांना (वैयक्तिक) हा पुरस्कार मिळाला आहे.

नवी दिल्ली येथे नुकतेच या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. भारती अण्णिगेरी या देवांगनगर, वडगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र. 295 मध्ये कार्यकत्या आहेत. दि. 10 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामधील सभागृहात पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यामध्ये केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाचे कार्यकारी संचालक आदित्य चोप्रा यांच्यासह सचिव राकेश श्रीवास्तव, एनआयटीआय आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार, संचालक डॉ. विनोदकुमार पॉल यांच्या हस्ते अण्णिगेरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पोषण माह अभियानांतर्गत राज्यातून सुमारे साडेतीन हजारहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा अहवाल (प्रोजेक्ट) सादर केला होता. भारती अण्णिगेरी यांच्या अहवालाची बेळगाव येथील शिशू विकास योजना अधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण खाते आणि बेंगळूर येथील खात्याच्या मुख्य कार्यालयात निवड झाली. यानंतर हा अहवाल केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्रालयास पाठविण्यात आला. या ठिकाणी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन भारती अण्णिगेरी यांची संपूर्ण कर्नाटकात वैयक्तिक ‘पोषण माह पुरस्कार’साठी निवड करण्यात आली.

भारती अण्णिगेरी यांनी आपल्या अन्य कार्यकर्त्या आणि साहाय्यिका यांच्या सहकार्याने पोषण माह-2018 अंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात जनजागृतीपर कार्यक्रम, रॅली, लहान मुलांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबविले होते. या कामात अंगणवाडीच्या वरि÷ अधिकाऱयांचे त्यांना मार्गदर्शन लाभले होते. याद्वारे बालकांमधील कुपोषितपणा दूर करून त्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी प्रयत्न केले होते. या सर्व कार्यक्रमांचा त्यांनी अहवाल (प्रोजेक्ट) सादर केला होता.

बालकांसाठी लसीकरण ‘व्हिटॅमिन ए’ दिन कार्यक्रम, पौष्टिक आहार शिबिर, पौष्टिक आहारासंबंधी प्रात्यक्षिके आणि महत्त्व सांगण्यासाठी कार्यक्रम, महिला तसेच मातांना मार्गदर्शन कार्यक्रम, प्रसूतीपूर्व आरोग्य दिन कार्यक्रम, गर्भवती लाभार्थी महिलांची ओटी भरणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती, मातृपूर्ण योजनेतील लाभार्थींना पौष्टिक भोजन, बालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, चित्रकला स्पर्धेद्वारे अंगणवाडी केंद्रातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागृती करणे, बालविवाहाबद्दल जागृती, मातृवंदना योजनेतील लाभार्थींच्या घरे भेट देणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, मातेकडून बालकांना पौष्टिक आहार देण्याबाबत माहिती देणे आदी कार्यक्रम अण्णिगेरी यांनी यशस्वीपणे राबविले होते. याची नोंद केंद्र सरकारच्या आणि बालकल्याण खात्याच्या पोषण अभियान विभागाने घेतली. कर्नाटकातून सुमारे साडेतीन हजारहून अधिक कार्यकर्त्यांच्या अहवालातून भारती अण्णिगेरी यांची ‘पोषण माह पुरस्कार’साठी निवड केली.

नवी दिल्ली येथील हॉटेल अशोकामधील सभागृहात दि. 10 ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळय़ात भारती अण्णिगेरी यांना प्रमाणपत्रासह विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण बेळगावकरांसाठी ही अभिमानास्पद अशीच कामगिरी आहे.