|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पवित्र प्रणाली विरुद्ध याचिका दाखल

पवित्र प्रणाली विरुद्ध याचिका दाखल 

जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाची माहिती : मुंबई उच्च न्यायालयात धाव

वार्ताहर / कुडाळ:

केवळ गुणवत्ता यादीतून शिक्षकांची निवड करताना त्याच्या अध्यापनाबाबत किती गुणदान करावे, याबाबतचा विषय स्पष्ट झालेला नाही. परंतु शासनाने या नव्या दुरुस्तीच्या विरुद्ध भूमिका घेऊन शाळा समितीचे अधिकार काढून घेऊन ते चक्क शिक्षणाधिकारी यांना पवित्र प्रणालीच्या माध्यमातून प्रदान केले आहेत. त्या पवित्र प्रणालीला आव्हान देणारी याचिका सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे, अशी माहिती संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत व सचिव ह. स. मांजरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 9 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमध्ये शाळा समितीचे नेमणुकीचे अधिकार शासनाने अबाधित ठेवले आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अशाच स्वरुपाची याचिका असून त्यामध्ये स्थगिती आदेश ठेवण्यात आले आहेत. परंतु त्या याचिकेमध्ये शाळा समितीवर शिक्षण उपसंचालकांचा एक प्रतिनिधी घ्यावा, असा प्रस्ताव शासनासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावास जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचा विरोध असल्यामुळे या मंडळाने स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यात याबाबतचा युक्तीवाद मांडला जाणार आहे. आठवडाभरात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मंडळाच्यावतीने ऍड. प्रशांत भावके काम पाहत आहेत. जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाची भूमिका शेगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात संस्थेचे अध्यक्ष जी. एम. सामंत यांनी मांडल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर संस्थाचालकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. कोल्हापूर विभागातील सहा जिल्हे मुंबई उच्च न्यायालयातील या याचिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत.

दरम्यान, संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पवित्र प्रणालीवर संस्थाचालकांनी कोणतीही माहिती भरू नये, असे आवाहन केले असून 2 नोव्हेंबर 2018 रोजी पवित्र प्रणालीमधील अन्यायकारक तरतुदींना विरोध तसेच अन्य मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करायचे ठरविले आहे, असे जाहीर केले आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.

Related posts: