|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शबरीमला मंदिराची द्वारे उघडली

शबरीमला मंदिराची द्वारे उघडली 

मात्र, भाविकांचा संघर्ष सुरूच, कडेकोट बंदोबस्त

शबरीमला / वृत्तसंस्था

केरळमधील शबरीमला येथील जगप्रसिद्ध अय्यप्पा स्वामी मंदिराचे द्वार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच उघडण्यात आले आहे. मासीक पूजेसाठी ते उघडण्यात आले आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे दर्शनासाठी लक्षावधी भाविक येथे जमले आहेत. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता प्रथेप्रमाणे मंदिराची द्वारे भाविकांसाठी उघडण्यात आली.

वय वर्षे 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची प्रथा गेली अनेक शकते पाळली जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देणे बंधनकारक आहे, असा निकाल काही आठवडय़ांपूर्वी दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या वयोगटातील महिलांना प्रतिबंध करण्यात आला आहे त्यांच्या उपस्थितीविषयी मोठी उत्सुकता होती.

महिलांना विरोध

विशिष्ट वयोगटातील महिलांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन असंख्य भाविकांनी केले आहे. तसेच या वयोगटातील महिलांना आडविले जाण्याचे प्रकारही समोर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शबरीमला भाविकांनी पुनर्विचार याचिका सादर केली आहे. तथापि, देवस्थानाच्या वतीने अशी याचिका सादर करण्यास केरळ सरकाने नकार दिला आहे.

कडेकोट बंदोबस्त

मंदिर परिसरात आणि भाविकांच्या निवासाच्या स्थानी केरळ सरकारने मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महिला पोलिसांसह 1000 पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. तसे असूनही महिलांना जाऊ न देण्याचे अनेक प्रकार घडले असून भाविकांच्या भावना तीव्र असल्याने पोलिसांवर बंधने येत आहेत.

काँगेस, भाजपचाही विरोध

विशिष्ट वयाच्या महिलांनी दर्शनासाठी जाण्याला विरोध करण्याच्या प्रयत्नांना आता राजकीय वळण लागले आहे. काँगेस आणि भाजप यांनीही जनभावना लक्षात घेऊन मंदिर प्रवेश विरोधकांचे समर्थन केले आहे. पांबा आणि निलक्कल येथे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश विरोधकांना साहाय्य केल्याचे दिसून आले.

महिलांचाही विरोध

या मंदिरात 10 ते 50 या वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जाऊ नयेत. यासाठी असंख्य भाविक महिलाही आग्रही आहेत. त्यांनीही आपली पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून तरूण महिलांना परत पाठविण्याचे सत्र सुरू आहे. एकंदर, परिसरात तणाव असून महिलांनी येथे येण्याचे टाळले असल्याचे दिसून येत आहे.

पत्रकारांना मारहाण

शबरीमला येथे मंदिर परिसरात गेलेल्या पत्रकारांनाही भाविकांनी मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक वृत्त वाहिन्यांच्या महिला पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या वाहनांची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी त्यांना संरक्षण देऊन सुरक्षित ठिकाणी नेले. त्यामुळे त्यांच्या वृत्तांकनात बाधा निर्माण झाली होती. भाविकांच्या भावना तीव्र असल्याचे प्रत्यंतर यावेळी आले असे अनेक पत्रकारांनी म्हटले आहे.

निलक्कल येथे पोलिसांशी झटापट

शबरीमला येथे जाण्यासाठी भाविक प्रथम या देवस्थानापासून 20 किलोमीटर दूर असणाऱया निलक्कल किंवा पांबा येथे येतात. तेथून पायी अय्यप्पा स्वामींची यात्रा प्रारंभ होते. मंगळवारपासूनच लक्षावधी भाविक निलक्कल येथे आले आहेत. भाविकांच्या पथकांकडून तेथेच त्यांची तपासणी केली जात असून 10 ते 50 वयोगटातील महिलांना परत जाण्याचा आग्रह केला जात आहे. पोलिसांनी या पथकांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्याने बुधवारी सकाळपासूनच पोलिस आणि भाविक यांच्यात अनेकदा झटापट झाली. अनेक भाविकांना ताब्यात घेण्यात आले. भाविकांनी उभे केलेले तंबू पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बराच काळ निलक्कल येथे तणावाचे वातावरण होते. पांबा येथील अशा अनेक झटापटी झाल्या.