|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन!

आश्वासनांच्या कात्रणांचे लवकरच प्रदर्शन! 

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली:

गेली चार वर्षे जनतेकडे दुर्लक्ष करणारे विद्यमान पालकमंत्री, खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी आता लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यावर आश्वासनांची खैरात करू लागले आहेत. या लोकप्रनिधींनी निवडून येण्यापूर्वी कोणती आश्वासने दिली व निवडून आल्यानंतर कशी फसवणूक केली, त्याच्या वृत्तपत्रातील कात्रणांचे प्रदर्शनच येत्या काळात मनसेतर्फे भरविण्यात येणार आहे. आपण काय आश्वासने दिली होती, याची जाणीव होण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.

येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएलच्या समस्या, महामार्ग प्रकल्पाचे निकृष्ट, नियमबाहय़ काम, रेल्वेचे प्रश्न, केंद्र सरकारचे प्रकल्प याबाबत कोणी कामे केली? आमदारांनी फक्त आरोग्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन आरोग्यविषयक प्रश्न सोडविल्याचे नाटक केले. परप्रांतिय मच्छीमारांचा त्रास स्थानिक मच्छीमारांसाठी आजही त्रासदायक ठरत आहे. अधिकाऱयांची अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध अधिकारी हे दुसऱया व चौथ्या शनिवारच्या दरम्यान गुरुवारीच जिल्हय़ातून गायब होतात व सोमवारी उगवतात. याबाबत या अधिकाऱयांचे गुरुवार ते सोमवार या कालावधीतील मोबाईल लोकेशन शोधावे, अशी मागणीही राज्याच्या मुख्य सचिवांकडे करण्यात येणार आहे.

जिल्हय़ात विक्री होणारे 65 टक्के दूध भेसळयुक्त आहे. जिल्हय़ात सुमारे 40 कंपन्या दूध विक्री करतात. शासकीय दूध डेअरी बंद करून अशा विक्रीला वाव देण्याचे काम यापूर्वीच्या व सध्याच्या पालकमंत्र्यांनी केले आहे. याबाबत अन्नभेसळ अधिकाऱयांना भेटून दुधाचे नमुने तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. निकृष्ट कामांतून अधिकाऱयांच्या खिशात निधी जात आहेत. अकार्यक्षम पालकमंत्री व विकासकामांकडे दुर्लक्ष करणारे खासदार, आमदार यामुळे जनतेला फक्त विकासाचे गाजर वाटण्याचे काम झाले आहे, असेही उपरकर म्हणाले.

यावेळी शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.