|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत

मालवणात ‘स्वस्थ भारत’ सायकल रॅलीचे स्वागत 

प्रतिनिधी / मालवण:

 केंद्रीय अन्न सुरक्षा मंत्रालय प्राधिकरणतर्पे देशातील जनतेला आरोग्य व संतुलित आहार स्वास्थ्य व शरीर तंदुरुस्तीचे महत्व पटवून देण्यासाठी पश्चिम विभागात पणजी ते दिल्ली अशी स्वस्थ भारत यात्रा सायकल रॅली काढण्यात आली आहे. सावंतवाडीतून शुक्रवारी मालवणमध्ये आलेल्या या सायकल रॅलीचे मालवण नगरपरिषदेने स्वागत केले. 20 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांमार्फत शहरात रॅली काढण्यात येईल. 21 रोजी हे विद्यार्थी सायकलने देवगडकडे रवाना होणार आहेत.

  राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय अन्न व आरोग्य मंत्रालयाने जनतेला आरोग्य, आहार व पोषण शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व पटवून देण्यासाठी 18 ऑक्टोबरपासून देशाच्या पश्चिम विभागात पणजी ते दिल्ली अशी स्वस्थ भारत यात्रा काढली आहे. त्याची सुरुवात गोवा-पणजी येथून झाली. आज सावंतवाडी येथील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी ते मालवण नगरपरिषद अशी सायकल रॅली काढली. यात सावंतवाडीतील 25 सायकलस्वार सहभागी झाले होते. मालवण नगरपरिषदेने या रॅलीत सहभागी झालेले अधिकारी व सायकलस्वारांचे स्वागत केले. रॅलीचे नियोजन सिंधुदुर्ग अन्न व औषध प्रशासन, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, नेहरू युवा केंद्र, महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएस विभाग यांनी केले.

 मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी रंजना गगे, नगरसेवक दीपक पाटकर, महिला आरोग्य सभापती तृप्ती मयेकर, नगरसेवक नितीन वाळके, गणेश कुशे, स्वस्थ भारत अभियानचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अन्नसुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर, वर्षा खरात, एनसीसीचे बीएचएम सकपाळ, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, दिल्ली येथील अधिकारी अखिलेश गुप्ता, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक कालिदास घाटवळ, स्वयंसेवक सहदेव पाटकर, गोपाळ लोके, मनीषा तोरसकर, सुदर्शन खांदारे आदी उपस्थित होते

  सावंतवाडीतील सायकलस्वारांकडून या रॅलीतील सायकल मालवणमधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या सायकल घेऊन एनसीसीचे विद्यार्थी 20 रोजी सकाळी 8 वाजता मालवण नगरपरिषद येथून शहरात सायकल रॅली काढणार आहेत. यानिमित्त येथील मामा वरेरकर नाटय़गृहात महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीर व अन्न व सुरक्षेबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. 21 रोजी एनसीसी विद्यार्थी मालवण येथून स्वस्थ भारत सायकल रॅलीने देवगडला रवाना होणार आहेत. रॅलीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात आले.