|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निरवडेत वीज पडून तरुण ठार

निरवडेत वीज पडून तरुण ठार 

सावंतवाडी उद्यमनगरात होता कामाला

वार्ताहर / सावंतवाडी:

घरात विजेचा लोळ जाऊन पडल्याने निरवडे झरबाजार येथील गणेश दिगंबर तेली (27) हा तरुण ठार झाला. गुरुवारी सायंकाळी दसऱयाला ही घटना घडली. सावंतवाडी कुटिर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गणेश याच्या निधनाने त्याच्या एकुलत्या एक बहिणीचा आधार हरपला आहे. त्यामुळे निरवडे दशक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह निरवडे भागात पाऊस सुरू झाला. दसरा असल्यामुळे गणेश घरातच होता. अचानक विजेचा लखलखाट झाला झाला अन् गणेश वीजमीटरच्या खाली जेथे बसला होता, तेथे त्याच्या अंगावर लोळ पडून तो गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी सावंतवाडी कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी गणेशचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

गणेश हा सावंतवाडी उद्यमनगरातील कंपनीत कामाला जात होता. त्यापूर्वी त्याने सावंतवाडी उभाबाजार येथील पोकळे यांच्या दुकानात काम केले होते. आई-वडिलांचे छत्र हरपलेला गणेश व त्याची बहीण अशी दोघेजण राहत होते. बहिणीचा आधार असलेला गणेश हा मनमिळावू स्वभावाचा होता.

गतवर्षी दसऱयालाच आईचे निधन

गणेश तेली याच्या आईचे गतवर्षी दसऱयालाच निधन झाले होते. त्यानंतर वर्षभरात त्याच दिवशी गणेशचे विजेच्या धक्क्याने निधन झाल्याने तेली कुटुंबियांवर  मोठा आघात झाला आहे. सरपंच प्रमोद गावडे, सभापती पंकज पेडणेकर, जि. प. सदस्य उत्तम पांढरे, माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर, संजय तानावडे आदींनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत तेली कुटुंबाला मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

Related posts: