|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डॉक्टरांनी रूग्ण, नातेवाईकांना विश्वासात घ्यावे

डॉक्टरांनी रूग्ण, नातेवाईकांना विश्वासात घ्यावे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाणीच्या घटना सध्या घडत आहेत. याला डॉक्टर, रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यातील दुरावत चाललेला संवाद कारणीभूत आहे. पक्षकाराला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही केस चालवता येत नाही तसेच रुग्ण व नातेवाईक यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यासाठी रुग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे असे मत ऍड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व इंडीयन मेडीकल असोसीएशन यांच्यावतीने आयोजित केएमकॉन 2018- 19 या वैद्यकीय शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केएमए फ्लॅश अंकाचे प्रकाशन व वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. पहिल्या सत्रात डॉ. सागर कदम, डॉ. मंजीत कुलकर्णी यांनी रेडीओलॉजी याबाबतची माहिती दिली. तर डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी गॅस्ट्रो बाबत माहिती दिली. डॉ. विकास कुलकर्णी, डॉ. डी. आर. श्रीनिवास यांनी कान नाक घसा याविषयी मार्गदर्शन केले.

   भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचे विघटन व्हायचे नसेल तर धोकादायक शक्तींपासून नेहमी सावध राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री ऍड. उज्वल निकम यांनी केले. तपास यंत्रणेमध्ये डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्या निदानावरच काही गोष्टींचे निकष ठरवले जातात. असे सांगत ऍड. निकम यांनी आपल्या कारकिर्दीतील विशेष खटल्यांबद्दल काही गोष्टी विशद केल्या. मुंबईवर 26 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याला केवळ आरोपी सिद्ध करणे हे आपले उद्दीष्ठ नव्हते तर यामध्ये पाकिस्तानचा हात असून त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणणे हे महत्वाचे होते असे मत निकम यांनी व्यक्त केले.  स्वतःचा आत्मविश्वास व दुसऱयाला ओळखण्याची क्षमता, अभ्यास, तर्क शक्ती आणि प्रसंगावधान यांच्या आधारावरच आपण गोष्टी साध्य करू शकतो. यानंतर प्रसिद्ध मेंदू तज्ञ डॉ. थिमाप्पा हेगडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मेंदूच्या विविध आजारांबाबत माहिती दिली.

   कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी असोसिएशनच्या उपक्रमाबद्दल व भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती दिली. सचिव डॉ. आबासाहेब शिर्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भरत कोटकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच डॉ. संतोष प्रभू यांनी या शिखर परिषदेमागील हेतू विषद केला. डॉ. अमर अडके यांनी सूत्रसंचालन केले.

 

Related posts: