|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » महाजन असते, तर देशाची स्थिती अधिक चांगली असती – हरिभाऊ बागडे

महाजन असते, तर देशाची स्थिती अधिक चांगली असती – हरिभाऊ बागडे 

पुणे/ प्रतिनिधी :

दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन आज असते, तर देशात आणखी चांगली परिस्थिती राहिली असती, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे काढले.

‘मुक्तछंद’तर्फे आयोजित ‘प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते पुण्यात बोलत होते. या वेळी दहशतवादविरोधी यंत्रणेचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील क्रॉस ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार विजेते डॉ. अरविंद नातू, किल्लारी भूकंपावेळचे बचाव पथक प्रमुख ले. क. सुमीत बक्षी, किल्लारी भूकंपात दीड वर्षे वयात ढिगाऱयाखाली 6 दिवस राहूनही बचावलेली मिरॅकल बेबी प्रिया जवळगे आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा बागडे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि नक्षत्रवृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी हरिभाऊ बागडे यांचाही आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बागडे म्हणाले, महाजन यांच्यासोबत 80 पासून 2006 पर्यंत खूपवेळा प्रवास करण्याचा योग आला. तसेच विविध बैठका त्यांच्यासोबत केल्या. देशातील सर्व पक्षप्रमुखांशी त्यांचे उत्तम संबंध होते. शरद पवार यांच्या घरी जाऊन तासन् तास गप्पा होत. कर्तृत्वासोबत उत्तम वक्तृत्व असलेले हे प्रगल्भ नेतृत्व होते. राजकीय जीवनात मोलाची कामगिरी करत भाजपची पाळेमुळे त्यांनी देशभर रुजविली. ते असते, तर देश आज आणखी पुढे गेला असता.

 प्रत्येक व्यक्ती समाजासाठी दिशादर्शक ः डॉ. अरविंद नातू

नातू यांनी सन्मानित झालेली प्रत्येक व्यक्ती समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. तसेच पुण्यातील माझा हा पहिला जाहीर नागरी सत्कार असल्याचे सांगत आपला प्रवास कथन केला. या प्रवासात आपली ऊर्जा बनलेल्या पत्नी व कन्येप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मिरॅकल बेबी प्रिया जवळगे हिने मी आज मिरॅकल मॅन सुमीत बक्षी यांच्यामुळे जीवंत असल्याचे सांगून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या निर्मितीत महाजन यांचे मोठे योगदान आहे. आज दहशतवादाशी लढताना मला या कायद्याचा फायदा होतो आहे.

30 वर्षांत आजारपणाचे बिल नाही

संघात राहताना शिकलो, की शरीराचे लाड करता कामा नयेत. शरीराला रगडले पाहिजे. या शिकवणीमुळे आणि व्यायामामुळे 30 वर्षात एकदाही आजारी पडलो नाही आणि आजारपणाचे बिल सरकारला दिलेले नाही, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.