|Saturday, March 23, 2019
You are here: Home » विविधा » अन् अतिदुर्गम आगळंबेत पसरले चैतन्याचे तेज..!

अन् अतिदुर्गम आगळंबेत पसरले चैतन्याचे तेज..! 

 

पुणे / प्रतिनिधी:

आकाशाशी स्पर्धा करणारे डोंगर, गवतात हरवलेले रस्ते, सागवानांची दाटी, दमछाक करायला लावणारी चढण…अशा वीज, पाण्यासह जीवनावश्यक गरजांपासून दूर असलेल्या आगळंबे येथील धनगरवाडय़ात सामाजिक कार्यकर्त्यांकडून आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली अन् आनंदाचे, चैतन्याचे तेज सर्वत्र भरून राहिले.

डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱया नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधव आणि नागनाथ पार सार्वजनिक ट्रस्टतर्फे हवेली तालुक्मयातील धनगरवाडा (आगळंबे) येथे दिवाळी फराळ, किराणा, नवीन कपडे, औषधे, फटाके, जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. नागनाथ पार सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश डाळिंबकर, कार्याध्यक्ष प्रितेश केदारी, डॉ. प्रसाद खंडागळे, वाल्मिकी ढोरकुले, महेश माने, प्रसाद चिकणे, सुरेश मांदळे, विनोद येलापूरकर, रवींद्र पठारे, रश्मी जाधव, स्वाती शेठ, उमा चिकणे, महेश ढमाले, आगळंबे गावचे सरपंच नितीन पायगुडे, उद्योजक दीपक पायगुडे, दिनकर ठाकर, ठाकरवाडी येथील जि. प. प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा बुंदे, शिक्षिका देवश्री रेपाळ यांनी धरनगरवाडा येथे जाऊन दिवाळीची भेट सुपूर्द केली.

अन् शहर, गावाची सीमारेषाच जणू हरवली….

मागील दहा वर्षांपासून दुर्गम, आदिवासी भागातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी भेट हा उपक्रम राबविला जातो. यासाठी तीन महिने आधी नियोजन करून गावाची निवड होते. यंदा धनगरवाडा गावात जाण्याचे पक्के झाले. डोंगरमाथ्याच्या अगदी माथ्यावर वसलेला केवळ 50 ते 60 लोकांच्या वस्तीचा हा धनगरवाडा. येथे जमीन नावाचा प्रकार नसल्याने केवळ डोंगरावर गुरे राखणे, हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. या वस्तीत मोजून 15 ते 20 घरे. मात्र एकाही घरात वीज नाही. साधे पिण्याचे पाणीदेखील 3 ते 4 किमीची पायपीट करून आणावे लागते. किराणा मालाच्या खरेदीसाठी येथील लोकांना दोन तासाची पायपीट करून डोंगर उतरून यावे लागते. वस्तीवर कोणी आजारी पडले, तरी झोळीत टाकून आणावे लागते. अशा दुर्गम वस्तीवर कुणीतरी शहरातून येऊन दिवाळी साजरी करणार, या भावनेने आजी, आजोबा, तरुण, लहान मुले, स्त्री, पुरुष सारेच हरखून गेले. यात शहर अन् गावाची सीमारेषाच जणू हरवून गेली. सारे एकत्र आले अन् दिवाळी खऱया अर्थाने गोड झाली.

शिक्षणासाठी चार तासाची पायपीट

धनगरवाडा या वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज चार तासाचा जंगलातून प्रवास करावा लागतो. येथील विद्यार्थ्यांना ठाकरवाडी आणि उरवडे असे दोन पर्याय आहेत. दोन्ही ठिकाणच्या शाळेत जाण्यासाठी डोंगर उतरून तसेच शाळा सुटल्यानंतर डोंगर चढून वस्तीवर यावे लागते. दोन्ही ठिकाणचे अंतर दोन तासाचे आहे. हा संपूर्ण प्रवास जंगलातला आहे. जंगलात रान डुकरासारखे हिंस्त्र प्राणी आहेत. शाळेला येणारी मुले 6 ते 8 वर्षे वयोगटातील आहेत. त्यामुळे हा प्रवास धोक्मयाचा आहे. केवळ शिक्षणाच्या जिद्दीने ही मुले रोज चार तासाचा प्रवास करतात. त्यांच्या मार्गातील हा अडथळय़ांचा अंधार दूर कधी होणार, हा प्रश्न आहे.

 

 

 

Related posts: