|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जामसंडे-कावलेवाडीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू

जामसंडे-कावलेवाडीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू 

प्रतिनिधी / देवगड:

जामसंडे कावलेवाडी येथील खाडीपात्रात होडी किनाऱयावर आणताना तेथील संजय यशवंत जोईल (53) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जोईल यांना फिट येण्याचा आजार होता. फिट आल्यानेच ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथील एका मच्छीमाराची मोठी फायबर नौका कावलेवाडी खाडीपात्रात होती. या नौकेवर पूजनाकरिता जाण्यासाठी बुधवारी सकाळी खाडीपात्रात नांगरून ठेवलेली छोटी होडी किनाऱयावर आणण्यासाठी जोईल जात होते. ते पाण्यात उतरुन होडीला लावलेल्या नांगराची दोरी ओढत असतानाच त्यांना फिट आली व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कावलेवाडी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती तेथील सुशिल कावले यांनी पोलिसांत दिली. पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे, पोलीस नाईक प्रशांत जाधव, चालक दादा परब यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संजय तारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत. दरम्यान, जोईल हे अविवाहित आहेत. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. तसेच त्यांना फिट येण्याचा आजार होता. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.

Related posts: