|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » नेमबाज अंगद बाजवाचे विक्रमी सुवर्ण

नेमबाज अंगद बाजवाचे विक्रमी सुवर्ण 

आठवी आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धा : स्कीट प्रकारात अंतिम फेरीत

वृत्तसंस्था / कुवेत सिटी

येथे सुरु असलेल्या आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अंगद वीर बाजवाने अंतिम फेरीत विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले. मंगळवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत त्याने 60 पैकी 60 गुणाची कमाई करत हा विक्रम रचला. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर शॉटगन स्कीट प्रकारात सुवर्ण मिळवणारा अंगद पहिला भारतीय ठरला आहे. तसेच 10 मी रायफल प्रकारात मिश्र गटात इलावेनिल-हृदय हजारिका जोडीने सुवर्ण तर मेहुली घोष व अर्जुन बबुटा जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम लढतीत अंगदने 60 पैकी 60 गुणाची कमाई केली. त्याने चीनच्या जी जिनला मागे टाकत सुवर्ण पटकावले. जिनने 58 गुणासह रौप्य तर युएईच्या सईद अल मकतोमने 46 गुणासह कांस्य पटकावले. पात्रता फेरीत अंगद 125 पैकी 121 गुण मिळवत संयुक्तपणे दुसऱया स्थानी राहिला होता. अंतिम फेरीत मात्र त्याने शानदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंगदच्या या विश्वविक्रमी कामगिरीनंतर राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणधीर सिंग यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

10 मी. रायफल प्रकारात इलावेनिल-हृदय जोडीचा सुवर्णवेध

या स्पर्धेत 10 मी. रायफल प्रकारात मिश्र जोडी गटात इलावेनिल-हृदय हजारिका जोडीने शानदार कामगिरीसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. या जोडीने 835.8 गुणाचा वेध घेत तिसऱया स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. अंतिम फेरीत देखील इलावेनिल-हृदय जोडीने 502.1 गुणाचा वेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. या गटात चीनच्या शेई मॅगोनो-वांग युफेंग जोडीने 500.9 गुणासह रौप्य तर भारताच्याच मेहुली घोष व अर्जुनने 436.9 गुणासह कांस्यपदक पटकावले.