|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

बार्सिलोनाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक 

वृत्तसंस्था/ सॅन सिरो

मॉरो इकार्डीने शेवटच्या क्षणी बरोबरीचा गोल केल्यानंतर देखील बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. दोन्ही संघातर्फे अंतिम टप्प्यातच गोल झाले. प्रारंभी, 83 व्या मिनिटाला माल्कमने बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. पण, त्यांची ही आघाडी केवळ चारच मिनिटे टिकली. इकार्डीने चक्क 87 व्या मिनिटाला सनसनाटी गोल केल्याने इंटर मिलानने बार्सिलोनाशी 1-1 अशी बरोबरी प्राप्त केली. सरस गुणाच्या आघाडीवर बार्सिलोना या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली.

बार्सिलोनाने या लढतीत जवळपास पूर्ण वेळ उत्तम वर्चस्व गाजवले. शेवटची काहीच मिनिटे बाकी असताना ते 1-0 फरकाने विजयी होत पूर्ण गुण वसूल करणार, अशी चिन्हे होती. पण, 87 व्या मिनिटाला इकार्डीने मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेत बार्सिलोनाला बरोबरीत रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला. ‘आम्ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळत होतो. येथे त्यांनी टिपिकल बार्सिलोना गोल केला. पण, आम्ही लढत राहिलो आणि याचमुळे अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना बरोबरीत रोखणे आम्हाला शक्य झाले’, अशी प्रतिक्रिया इकार्डीने व्यक्त केली.

बार्सिलोनाचा मिडफिल्डर सर्जिओ बस्केट्सने मात्र अंतिम क्षणी केलेल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला. ‘ईनसाईड एरियामध्ये आमच्याकडून गफलत झाली आणि याचमुळे बरोबरीवर समाधान मानण्याची किंमत मोजावी लागत आहे’, असे तो म्हणाला. बार्सिलोनाचा संघ सध्या लायोनेल मेस्सीविना खेळत आहे. येथे या संघाला पूर्ण गुण अपेक्षित होते. पण, ते शक्य झाले नाही. बार्सिलोना प्रशिक्षक अर्नेस्टो यांनी पूर्ण गुण वसूल करता आले नसले तरी उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करण्याचे उद्दिष्टय़ या लढतीच्या माध्यमातून साध्य केले असल्याचे नमूद केले.