|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » किवीज फलंदाजांचा विश्वविक्रम, एकाच षटकात चोपल्या 43 धावा!

किवीज फलंदाजांचा विश्वविक्रम, एकाच षटकात चोपल्या 43 धावा! 

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

सेंट्रल डिस्ट्रीक्ट्स संघाचा मध्यमगती गोलंदाज विलेम ल्युडिक याच्या एकाच षटकात 43 धावांची आतषबाजी करत नॉर्थन डिस्ट्रिक्ट संघाने नवा विश्वविक्रम रचला. नॉर्थन संघाचे फलंदाज जो कार्टर व ब्रेट हॅम्प्टन यांनी 6 षटकार खेचले आणि त्यातील दोन षटकार नोबॉलवरील होते. याशिवाय, एक चौकार व एक एकेरी धाव, अशा एकूण 43 धावा यात वसूल केल्या गेल्या. येथील सेडॉन पार्कवर झालेल्या या लढतीत कार्टर 102 धावांवर नाबाद राहिला तर हॅम्प्टन 95 धावांवर बाद झाला होता.

या उभयतांच्या आतषबाजीमुळे नॉर्थन डिस्ट्रीक्ट संघाने 50 षटकात 7 बाद 313 धावांची आतषबाजी केली तर नंतर हा सामना त्यांनी 25 धावांनी जिंकला. आपल्या निम्यापेक्षा अधिक धावा केवळ एकाच षटकात देणाऱया ल्युडिकचे सामन्यातील पृथ्थकरण 10 षटकात 85 धावात 1 बळी, असे प्रचंड महागडे ठरले. ‘सी बॉल, हिट बॉल’, हेच माझ्यासमोरचे लक्ष्य होते. त्यातच दोन नोबॉलमुळे आम्हाला एकाच षटकात 43 धावांचा विश्वविक्रम इथे रचता आला, अशी प्रतिक्रिया हॅम्प्टनने व्यक्त केली. सदर षटक पूर्ण झाल्यानंतर आम्ही धावा मोजल्या आणि त्या 39 असाव्यात असा आमचा अंदाज होता. पण, आम्ही चार धावा मोजण्यात कुठे तरी चुकलो, अशी मिश्किल प्रतिक्रियाही त्याने दिली.

यापूर्वी, एकाच षटकात 6 षटकार खेचण्याचा विक्रम काही वेळा झाला. रवी शास्त्रीने तिलक राज तर गॅरी सोबर्सने माल्कम नॅशच्या गोलंदाजीवर त्याने क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ शेम’मध्ये बसवले. दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज हर्षल गिब्ज यानेही 2007 विश्वचषक स्पर्धेत हॉलंडचा डान व्हान बंगला एकाच षटकात 6 षटकार खेचले. वनडे क्रिकेटमधील हा उच्चांक आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम झिम्बाब्वेच्या इल्टॉन चिगुम्बुराच्या खात्यावर आहे. त्याने 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध अलाउद्दीन बाबूच्या एकाच षटकात 39 धावा वसूल केल्या होत्या.