|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » फोक्स, स्पिनर्समुळे इंग्लंडचे वर्चस्व

फोक्स, स्पिनर्समुळे इंग्लंडचे वर्चस्व 

लंकेविरुद्ध पहिली कसोटी दुसरा दिवस : फोक्सचे पदार्पणात शतक, मोईनचे 4 बळी

वृत्तसंस्था / गॅले

पदार्पणवीर बेन फोक्सचे शतक आणि मोईन अलीचा भेदक फिरकी माऱयामुळे इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी यजमान लंकेवर 139 धावांची आघाडी घेतली आहे. लंकेचा डाव 203 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दिवसअखेर दुसऱया डावात बिनबाद 38 धावा जमविल्या होत्या.

8 बाद 321 या धावसंख्येवरून इंग्लंडने दुसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि आणखी 21 धावांची भर घातल्यानंतर त्यांचा डाव 342 धावांवर संपुष्टात आला. फोक्सने 102 धावा जमविताना 202 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार मारले. त्यानंतर फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मोईन अलीच्या फिरकीसमोर लंकेचा पहिला डाव 203 धावांत आटोपल्याने इंग्लंडला पहिल्या डावात 139 धावांची आघाडी मिळाली. अलीने चार बळी टिपले तर जॅक लीच व आदिल रशिद यांनी प्रत्येकी 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडने दिवसअखेर 12 षटकांत बिनबाद 38 धावा जमवित एकूण 177 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसअखेर रॉरी बर्न्स 11 व कीटॉन जेनिंग्स 26 धावांवर खेळत होते.

बेन फोक्स हा इंग्लंडच्या पहिल्या डावातील खरा तारणहार ठरला. त्याने संयमी खेळी करीत सहकाऱयांच्या साथीने इंग्लंडला फिरकीस मदत करणाऱया खेळपट्टीवर बऱयापैकी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. 25 वषीय फोक्सला जखमी यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या दिवशी तो 87 धावांवर खेळत होता आणि दुसऱया दिवशी शतक पूर्ण करताना आणखी 20 धावांची भर घातली. याशिवाय तो पदार्पणाच्या कसोटीतच शतक नोंदवणारा तो जगातील पाचवा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे.

लंकेची प्रारंभापासूनच पडझड

लंकेची पहिल्या षटकापासूनच घसरगुंडीला सुरुवात झाली आणि लवकरच त्यांची स्थिती 6 बाद 136 अशी झाली तेव्हा ते दोनशे धावांचा टप्पाही गाठू शकणार नाहीत, असे वाटले होते. पण माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने झुंजार अर्धशतक नोंदवत व तळाच्या सहकाऱयांच्या साथीने संघाला दोनशेची मजल मारून दिली. त्याने 122 चेंडूत 52 धावांची खेळी करताना 3 चौकार मारले आणि कर्णधार दिनेश चंडिमलसमवेत पाचव्या गडय़ासाठी 75 धावांची भागीदारी केली. चंडिमलने 72 चेंडूत 33 धावा जमवित इंग्लंडच्या गोलंदाजांचा विरस केला. रशिदने अखेर ही जोडी फोडण्यात यश मिळविताना चंडिमलला यष्टिचीत केले. नंतर मँथ्यूजने कसोटीतील 30 वे अर्धशतक पूर्ण केले. पण चहापानानंतर तो पहिल्याच षटकांत बाद झाला. मोईनने त्याला जेनिंग्सकरवी झेलबाद केले.

इंग्लंडच्या डावात 5 बळी टिपलेल्या दिलरुवान परेराने 21 धावांचे योगदान देताना कसोटीतील एक हजार धावांचा टप्पाही पार केला. तो 100 बळी व 1000 धावा सर्वात जलद पूर्ण करणारा लंकन खेळाडू बनला आहे. इंग्लंडच्या बर्न्सला फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करताना जोरदार फटका बसला, त्यावेळी पंचांनी लगेचच चहापानासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. डिकवेलाचा (28) स्वीपचा फटका अडविताना त्याने डक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंडू त्याच्या मानेच्या खालच्या बाजूस आदळला. मात्र चहापानानंतर तो पुन्हा क्षेत्ररक्षणास मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांना दिलासा मिळाला.

हेराथला मानवंदना

शेवटची कसोटी खेळणारा रंगना हेराथ मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली आणि इंग्लंडच्या खेळाडूंनीही दुतर्फा उभे राहत टाळय़ा वाजवून त्याचे स्वागत केले. रशिदने सुरंगा लकमलला 15 धावांवर बाद करून लंकेचा डाव संपुष्टात आणल्यामुळे हेराथ 14 धावांवर नाबाद राहिला. 40 वषीय हेराथने या कसोटीनंतर निवृत्त होणार असल्याचे मालिका सुरू होण्याआधीच जाहीर केले होते. त्याचे हे आवडते मैदान असून याच मैदानापासून त्याने सुरुवात केली होती आणि आता शेवटच्या कसोटीत त्याने त्यावर बळींचे शतकही पूर्ण केले. त्याने 93 कसोटीत आतापर्यंत 431 बळी मिळविले आहेत.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 97 षटकांत सर्व बाद 342 : बर्न्स 9 (12 चेंडूत 2 चौकार), जेनिंग्स 46 (53 चेंडूत 7 चौकार), मोईन अली 0 (1 चेंडू), रूट 35 (46 चेंडूत 5 चौकार), स्टोक्स 7 (19 चेंडूत 1 चौकार), बटलर 38 (72 चेंडूत 4 चौकार), फोक्स 107 (202 चेंडूत 10 चौकार), करन 48 (104 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), रशिद 35 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), लीच 15 (17 चेंडूत 2 चौकार), अँडरसन नाबाद 0, अवांतर 2, लकमल 3-73, डी. परेरा 5-75, अकिला धनंजय 1-96, हेराथ 1-78.

लंका प.डाव 68 षटकांत सर्व बाद 203 : करुणारत्ने 4 (2 चेंडूत 1 चौकार), जेके सिल्वा 1 (6 चेंडू), डीएम डिसिल्वा 14 (47 चेंडू), कुशल मेंडिस 19 (32 चेंडूत 4 चौकार), मॅथ्यूज 52 (122 चेंडूत 3 चौकार), चंडिमल 33 (72 चेंडूत 3 चौकार), डिकवेला 28 (39 चेंडूत 3 चौकार), डीके परेरा 21 (49 चेडूत 2 चौकार), धनंजय 0 (3 चेंडू), लकमल 15 (20 चेंडूत 2 चौकार), हेराथ नाबाद 14 (16 चेंडूत 2 चौकार), अवांतर 2, मोईन अली 4-66, लीच 2-41, रशिद 2-30, अँडरसन 1-26, करन 1-16.

इंग्लंड दु.डाव 12 षटकांत बिनबाद 38 : बर्न्स खेळत आहे 11 (28 चेंडूत 1 चौकार), जेनिंग्स खेळत आहे 26 (44 चेंडूत 3 चौकार).

 

Related posts: