|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘काहीही करा, अन् सोशल मीडियावर टाका’!

‘काहीही करा, अन् सोशल मीडियावर टाका’! 

नव्या पिढीला सेल्फीचे वेड : अध्ययनातून दुष्परिणाम उघड, आत्मप्रीतिवादाचे प्रमाण वाढले

वृत्तसंस्था/ लंडन 

‘नेकी कर दरियामें डाल’ अशी हिंदी म्हण आहे, परंतु आता लोक ‘काहीही करा आणि सोशल मीडियावर टाका’ असेच वागू लागले आहेत. या वृत्तीमुळे केवळ शब्दांमध्येच नव्हे तर आमचे वर्तन आणि व्यक्तिमत्वात देखील बदल झाला आहे. याचे मुख्य कारण लोकांकडून समाजमाध्यमांचा अधिक वापर आणि सातत्याने वाढत्या पोस्ट करण्याची सवय आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या जाणाऱया सेल्फींची क्रेझ मागील काही काळापासून सातत्याने वाढतेय. आता यावरून करण्यात आलेल्या एका अध्ययनात याच्या दुष्परिणामांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

अधिक सेल्फी पोस्ट करणाऱया लोकांमध्ये आत्मप्रीतिवाद वाढत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लोकांमधील हा बदल चांगला संकेत निश्चितच नाही. ओपन सायकॉलॉजी नावाच्या जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधक एका विशेष अध्ययनाच्या आधारावर या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे यात म्हटले गेले आहे. संशोधकांनी अध्ययनासाठी 18 ते 34 वर्षांच्या 74 जणांवर देखरेख ठेवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होणारा बदल अभ्यासला आहे. ब्रिटनच्या स्वांजी युनिव्हर्सिटी आणि इटलीच्या मिलान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संयुक्तपणे हे अध्ययन केले आहे. संशोधकांनी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवरील संबंधितांच्या हालचालींवर देखरेख ठेवली. आत्मप्रीतिवाद व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्टय़ असून यात व्यक्ती स्वतःला अत्यंत अधिक प्रमाणात प्रदर्शित करतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः हक्कदार असल्याचे समजतो, त्याचबरोबर इतरांना कमी लेखत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

समाजमाध्यमांचा ज्यांनी अधिक वापर केला आणि अत्याधिक सेल्फी पोस्ट केल्या, त्यांच्यात आत्मप्रीतिवादाच्या लक्षणात 25 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. अशा व्यक्तींमध्ये या लक्षणाचे प्रमाण आजाराच्या पातळीवर पोहोचले होते, हे प्रमाण त्यांच्या व्यक्तिमत्त्वासोबतच आरोग्यासाठी देखील हानिकारक होते, असे अध्ययनात आढळले आहे.

सहभागी व्यक्तींनी सेल्फी सर्वाधिक फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. एकूण सेल्फीच्या 60 टक्के सेल्फी फेसबुकवर, 25 टक्के इन्स्टाग्रामवर आणि 13 टक्के ट्विटर, स्नॅपचॅट आणि अन्य संकेतस्थळांवर पोस्ट करण्यात आल्याचे अध्ययनात दिसून आले आहे.

हे देखील दिसून आले…

जे लोक ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉगिंग साइटचा स्वतःचे विचार मांडण्यासाठी अधिक वापर करतात, त्यांच्यात अशाप्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत. म्हणजेच आत्मप्रीतिवादाची लक्षणे केवळ अधिक सेल्फी पोस्ट करणाऱयांमध्येच आढळल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

 

2 टक्के जण आजाराने ग्रस्त

वारंवार सेल्फी घेणे आणि सुंदर दिसण्यासाठी फिल्टर्सचा वापर करून छायाचित्राचे एडिटिंग करणे आता छंद नव्हे तर मानसिक आजार ठरत चालला आहे. छायाचित्र, विशेषकरून सेल्फीत सुंदर दिसणारे तरुण-तरुणी शारीरिक कुरुपता विषयक मानसिक आजाराचे बळी ठरत चालले आहेत. तरुण-तरुणी अगोदर सेल्फी काढतात आणि नंतर त्यांना ती न आवडल्यास एडिटिंगच्या माध्यमातून स्वतःचा लुक चांगला करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार छायाचित्रात सुंदर न दिसल्यास लोक प्लास्टिक सर्जरी आणि अन्य थेरपींकडे वळत आहेत. एकूण लोकसंख्येतील सुमारे 2 टक्के लोक या आजाराचे बळी ठरल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.