|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पसार मलपी ट्रॉलरमुळे मत्स्य विभाग अडचणीत

पसार मलपी ट्रॉलरमुळे मत्स्य विभाग अडचणीत 

अधिकाऱयांनी ट्रॉलर पळवून लावला : मच्छीमार, विविध राजकीय पक्षांचा आरोप : सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराव

पळालेल्या ट्रॉलरमध्ये बंपर मासळी : परवाना अधिकाऱयाच्या निलंबनाची मागणी

प्रतिनिधी / मालवण:

समुद्रात अनधिकृतरित्या घुसखोरी करून मासेमारी करणारा मलपी येथील एक हायस्पीड ट्रॉलर मत्स्य व्यवसायाच्या गस्तीनौकेने पकडला होता. रविवारी उशिरा हा ट्रॉलर मालवण बंदरात आणण्यात आला. या ट्रॉलरवर मोठय़ा प्रमाणात मासळी आढळल्याने सोमवारी सकाळी या मासळीचा लिलाव होणार होता. गस्तीनौकेवरील मत्स्य व्यवसायचे अधिकारी प्रदीप वस्त यांच्या पथकाने तो पकडला होता. मात्र, कारवाई अगोदरच रविवारी रात्री ट्रॉलरने पळ काढल्याने मत्स्य व्यवसाय विभाग अडचणीत आला.

दरम्यान, मंगळवारी शिवसेना, मनसे, भाजप नेते आणि मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त राजकुमार महाडिक यांना घेराव घालून पळून गेलेल्या ट्रॉलरबाबत जाब विचारला. आयुक्तांनी आपल्याला याबाबत संबंधित अधिकाऱयाने कोणतीही कल्पना दिलेली नसून गेले दोन दिवस तो अधिकारी कार्यालयातच आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे आक्रमक मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अर्थपूर्ण सेटिंगमुळेच ट्रॉलरने पळ काढला असून याप्रकरणी संबंधित अधिकाऱयाची चौकशी करून त्याला निलंबित करण्याची मागणी केली.

मच्छीमार आक्रमक, प्रशासनाकडे उत्तर नाही

पकडण्यात आलेल्या ट्रॉलरवर मासळी किती होती, ट्रॉलरवर पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही, सुरक्षा रक्षक काय करीत होते? असा प्रश्नांचा भडीमार मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्तांवर केला. त्यावर आयुक्तांनी आपल्याकडे अद्याप कोणताही अहवाल आलेला नसून तो आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. संबंधित अधिकाऱयाचे निलंबन करून पळून गेलेल्या ट्रॉलरवरील मासळीचा दंड अधिकाऱयाच्या पगारातून वसूल करण्याची मागणी मच्छीमारांनी लावून धरली.  दुपारपर्यंत मच्छीमार मत्स्य व्यवसाय कार्यालयात ठाण मांडून बसले होते.

पाहणीत अधिकारी गायब

मलपीचा ट्रॉलर पकडल्यानंतर त्यावरील जप्त केलेली कागदपत्रे घेऊन अधिकारी प्रदीप वस्त हे मुख्य कार्यालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे चार्ज असलेल्या दांडी येथील कार्यालयात मच्छीमार सहाय्यक आयुक्तांना घेऊन गेले. मात्र, त्याही ठिकाणी वस्त नव्हते. त्यामुळे ते कागदपत्रे घेऊन पसार झाले काय? मलपीच्या ट्रॉलरवर तपासणी करताना वस्त दिसत होते. त्यामुळे आता त्यांचा मोबाईल लागत नसल्याने ते बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार द्या, अशी सूचना मच्छीमारांनी आयुक्तांना केली.

 पाच लाखाची मासळीची शक्यता, व्हीडिओही व्हायरल

रविवारी परराज्यातील ट्रॉलर्सनी येथील समुद्रात घुसखोरी केल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांना मिळाली होती. त्यामुळे मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेद्वारे गस्त मोहीम राबविण्यात आली. यात सापडलेला मलपीचा ट्रॉलर मालवण बंदरात आणण्यात आला होता. मच्छीमारांनी ट्रॉलरवरील मासळीची मत्स्य अधिकारी वस्त यांच्यासमवेत पाहणी केली होती. सुरमई, पापलेट, बळा, लेप यातील सुमारे पाच लाख रुपयांची मासळी या ट्रॉलरवर असल्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. पाचपट दंड होण्याच्या भीतीने ट्रॉलर मालकाने अर्थपूणे सेटिंग मत्स्य व्यवसाय विभागाबरोबर करीत पळ काढल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या ट्रॉलरवरील मासळीचा व्हीडिओही मच्छीमारांनी मिळविला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुन्हा का दाखल नाही?

सिंधुदुर्गात घुसखोरी करणाऱया बोटी पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात देणारे मच्छीमार जॉन नऱहोना आणि गोपीनाथ तांडेल आदी सहकाऱयांवर पोलिसांनी दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला. मात्र, शासनाच्या ताब्यातील ट्रॉलर पळवून नेणाऱया आणि नेण्यास साथ करणाऱया अधिकाऱयांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राजकीय पक्षांकडूनही नाराजी व्यक्त

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, भाऊ मोर्जे, संतोष देसाई, बाबू आचरेकर, भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, गिरकर, शैलेश अंधारी आदींनी मत्स्य व्यवसाय कार्यालयात जाऊन पळून गेलेल्या ट्रॉलरबाबत सहाय्यक आयुक्तांना जाब विचारला.

सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली, जाळय़ांचे नुकसान

गवंडीवाडा येथील मोतेस फर्नांडिस यांची पात मासेमारीसाठी समुद्रात असताना मलपीच्या ट्रॉलरकडून त्यांच्या पातीवर चाल करण्यात आली. ट्रॉलर अंगावर चालून येत असल्याचे पाहून मोतेसच्या सहकाऱयांनी पातीवरील मासळीची जाळी कापली अन् ट्रॉलरसमोरून पात बाजूला नेली. मात्र, ट्रॉलरने मोतेस यांच्या मच्छीमार जाळय़ांवरून ट्रॉलर नेत सुमारे दोन लाख रुपये किंमतीची जाळी ओढून नेली. त्यामुळे जीवावरचे जाळय़ांवर बेतले. मलपीच्या ट्रॉलरवर कडक कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली.