|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी

तामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी 

चक्रीवादळाचा किनारपट्टीला दणका : अनेक झाडे जमीनदोस्त : वीज यंत्रणाही कोलमडली

सालेम / वृत्तसंस्था

बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर ‘गाजा’ चक्रीवादळात झाल्यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात शुक्रवारी दाणादाण उडाली. ‘गाजा’ चक्रीवादळाच्या दणक्यात 20 बळी गेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डलूर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे. दरम्यान, किनारपट्टी भागातील जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून देण्यात आली.

‘गाजा’ चक्रीवादळाच्या धोक्यामुळे तामिळनाडूत गुरुवारी हायअलर्ट जारी करण्यात आला होता. या वादळाच्या दणक्यामुळे चेन्नईसह परिसरात जोरदार वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. चक्रीवादळाच्या धोक्यामुळे येथे 30 हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. तामिळनाडूमधील कुड्डलूर आणि पम्बन भागातील किनाऱयाला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. चक्रीवादळात किनाऱयालगतच्या भागामध्ये ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. ‘गाजा’ चक्रीवादळ गुरुवारी तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्मयता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आल्याने किनारपट्टीवरील लोकांना सतर्क करण्यात आले. सतर्कतेमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली होती. लोक झोपेत असतानाच चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाली. तसेच बऱयाच भागात वीज यंत्रणाही कोलमडली आहे. दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदतकार्यात सहभागी झाली आहेत. बचावकार्यासाठी 30,000 कर्मचाऱयांना तैनात ठेवण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास ‘गाजा’ची धडक

पहाटेच्या सुमारास तामिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱयाला चक्रीवादळ धडकले. तत्पूर्वी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास एकाएकी वेगाने वाहणाऱया वाऱयांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळ जमिनीवर येताच तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्हय़ांमध्ये मोठय़ा पावसाला सुरुवात झाली. नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे किनाऱयाजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. चक्रीवादळामुळे कुड्डलूरमध्ये आठ आणि थंजावूरमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढील 24 तास धोक्याचे

पुढील 24 तासांत गाजा चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्मयता हवामान विभागाने दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता मोठी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले आहे. आता नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तामिळनाडू सरकारने किनारपट्टीच्या भागातील सुमारे लाखभर लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.