|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा » रूटच्या शतकाने इंग्लंडला विजयाची संधी

रूटच्या शतकाने इंग्लंडला विजयाची संधी 

लंकेविरुद्धची दुसरी कसोटी तिसरा दिवस

वृत्तसंस्था/ कँडी

कर्णधार जो रूटने चमकदार शतक नोंदवत येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी इंग्लंड संघाला मालिकाविजय मिळवून देण्याची संधी निर्माण करून दिली आहे. त्याला रॉरी बर्न्स व बेन फोक्स यांनी अर्धशतके झळकावत मोलाची साथ दिली असून दिवसअखेर इंग्लंडने दुसऱया डावात 9 बाद 324 धावा जमवित लंकेवर 278 धावांची आघाडी घेतली आहे. खेळपट्टी फिरकीस अनुकूल ठरणारी असल्याने इंग्लंडला एवढय़ा धावाही पुरेशा ठरू शकतील, अशी स्थिती आहे.

गॅलेतील पहिली कसोटी जिंकून इंग्लंडने याआधीच मालिकेत आघाडी घेतली आहे. बिनबाद 0 धावावरून इंग्लंडने तिसऱया दिवसाच्या खेळास सुरुवात केली. पण लीच एका धावेवर बाद झाल्यानंतर रॉरी बर्न्सने पहिले कसोटी अर्धशतक नोंदवले. त्यानंतर केवळ दुसरी कसोटी खेळणाऱया यष्टिरक्षक फोक्सनेही शतकवीर रूट बाद झाल्यानंतर नाबाद अर्धशतक झळकावत इंग्लंडची आघाडी वाढविण्याचे काम केले. दिवसअखेर तो 51 धावांवर खेळत होता. त्याला अँडरसन 4 धावा काढून साथ देत आहे. 6 बाद 219 अशा स्थितीनंतर कर्णधार रूट व फोक्स यानी सातव्या गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी करीत त्यांचा डाव लवकर गुंडाळण्याच्या लंकेच्या आशेवर पाणी फेरले. लंकेच्या अकिला धनंजयाच्या शैलीवर गॅले कसोटीनंतर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र अपील होईपर्यंत त्याला खेळण्याची मुभा आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 106 धावांत 6 बळी मिळविले. पाचहून अधिक बळी मिळविण्याची 5 कसोटीतील त्याची ही तिसरी वेळ आहे. मात्र त्याची कामगिरी लंकेला जिंकून देण्यास पुरेशी ठरणार नाही, असे वाटते.

रिव्हर्स स्वीप, स्वीपचा इंग्लंडकडून वापर

तिसऱया दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर नाईट वॉचमन लीच दुसऱयाच षटकात एका धावेवर बाद झाला. त्यामुळे नियमित सलामीवीर बर्न्स व जेनिंग्स एकत्र आले. बर्न्सने पदलालित्याचा वापर करीत लंकन फिरकी मारा सहजपणे खेळून काढला तर जेनिंग्सने रिव्हर्स स्वीपचा सढळ वापर करीत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यशही आले. पण या जोडीने 73 धावांची भर घातल्यानंतर जेनिंग्स याच फटक्मयावर 26 धावांवर असताना बाद झाला. चेंडूने त्याच्या ग्लव्ह्जला स्पर्श करून स्लिपमधील धनंजया डिसिल्वाच्या हातात विसावला. बर्न्सने 66 चेंडूच्या खेळीत 7 चौकार मारत 59 धावांचे योगदान दिले. स्वीपचा फटका मारताना तो पायचीत झाला. त्याने रिव्हय़ूही घेतला. पण तो त्याच्याविरुद्ध गेला. पुढच्याच षटकात बेन स्टोक्स शून्यावर पायचीत झाल्याने इंग्लंडला आणखी एक धक्का बसला. दिलरुवान परेराला स्वीप करण्याचा त्याचाही प्रयत्न फसल्याने तो पायचीत झाला.

रूटचे 15 वे कसोटी शतक

गुरुवारी पंचांच्या एका निर्णयावर नापसंती दर्शविल्यानंतर आयसीसीने कर्णधार रूटला समज दिली होती आणि एक डिमेरिट गुणही दिला होता. त्याने व जोस बटलरने लंकन फिरकीवर आक्रमण करण्याचे धोरण आखले आणि 74 धावांची भागीदारी करीत इंग्लंडला वर्चस्व मिळवून दिले. अकिला धनंजयाला रिव्हर्स स्वीप करताना चेंडू यष्टय़ांवर ओढवून घेतल्याने बटलरची 34 धावांची चमकदार खेळी संपुष्टात आली. त्याने 45 चेंडूत 3 चौकार मारले. मोईन अलीही जास्त वेळ टिकला नाही. त्यालाही धनंजयाने पायचीत केले. दुसऱया बाजूने सहकारी बाद होत असले तरी रूटने आपली बाजू भक्कम ठेवली होती. त्याने नंतर 15 वे कसोटी शतक (124) पूर्ण केले. त्यात 10 चौकार, दोन षटकारांचा समावेश होता. त्यानेही आपल्या खेळीत स्वीपचा सढळ वापर केला. धनंजयाने रूट व सॅम करन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले आणि नंतर रशिदलाही 2 धावांवर पायचीत करून इंग्लंडची स्थिती 9 बाद 305 अशी केली. रशिदला पायचीत देण्याचा निर्णय मात्र संशयास्पद ठरला. रिप्लेमध्ये चेंडूने त्याच्या बॅटला स्पर्श केल्याचे दिसून आले होते. पण फोक्सने अँडरसनच्या साथीने आघाडी वाढविण्याचा प्रयत्न करीत शेवटच्या गडय़ासाठी 19 धावांची भर घातली आहे. फोक्सने 102 चेंडूत 3 चौकार, एका षटकारासह नाबाद 51 धावा केल्या आहेत. लंकेच्या धनंजयाने 6, परेराने 2 व पुष्पकुमाराने एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव – 75.4 षटकांत सर्व बाद 285.

लंका प.डाव : 103  षटकांत सर्व बाद 336.

इंग्लंड दु.डाव 76 षटकांत 9 बाद 324 : बर्न्स 59 (66 चेंडूत 7 चौकार), जेनिंग्स 26 (54 चेंडूत 1 चौकार), रूट 124 (146 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), स्टोक्स 0,, बटलर 34 (45 चेंडूत 3 चौकार), मोईन 10 (14 चेंडूत 1 षटकार), फोक्स खेळत आहे 51 (102 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), करन 0, रशिद 2 (13 चेंडू), अँडरसन खेळत आहे 4 (2 चेंडूत 1 चौकार), अवांतर 13, अकिला धनंजया 6-106, डी. परेरा 2-87, पुष्पकुमारा 1-97.

 

Related posts: