|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिनबाबत सरकारने सत्य सांगावे

फॉर्मेलिनबाबत सरकारने सत्य सांगावे 

प्रतिनिधी/ पणजी

फॉर्मेलिनबाबत सरकारने जनतेची सतत फसणूक केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री विश्वजित राणे व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनीही लोकांची फसवणूक केली आहे. गोव्यातील जनता मासळी खाण्यास धजावत नाही. त्यामुळे जनतेला विश्वास निर्माण होईल, अशी भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर एफडीएच्या संचालिका ज्योती देसाई यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.

भाजप सरकारने फॉर्मेलिनच्या विषयावरून जनतेची मोठी फसवणूक केली. या प्रकरणातील गुन्हेगार असलेल्या विरोधात आजपर्यंत तक्रार दाखल होऊ शकली नाही. इब्राहीम मौलाना यांच्याविरोधात कारवाई होऊ नये म्हणून कोण दबाव आणतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जूनमध्ये मासळीतील फॉर्मेलिनचा वापर उघड झाला. त्यावेळी मंत्री विजय सरदेसाई यांनी पर्मिशीबल लिमिटमध्ये मासळीत फॉर्मेलिन असल्याचा दावा केला. तर मंत्री विश्वजित राणे यांनीही मासळीत फॉर्मेलिन नसल्याचा दावा केला. त्यानंतर दुसऱया दिवशी विश्वजित यांनी माफी मागितली. पर्मिशीबल हा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले.

त्यावेळी फॉर्मेलिनवर बोलणाऱयांवर खुद्द मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत टीका केली. भाजीपाल्यातही फॉर्मेलिन आहे, अंडय़ातही आहे, अशी टीका ते करीत होते. अन्न आणि औषध प्रशासन संचालिका ज्योती यांनीही मासळीत फॉर्मेलिन नसल्याचा दावा केला. पण तरीही लोक विश्वास ठेवायला तयार होत नाही.

सरकारकडून कारवाई नाही

फॉर्मेलिनचा विषय होऊन पाच महिने उलटले. पण अद्याप सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्या विरोधात अद्याप तक्रार दाखल होऊ शकली नाही. 15 कोटी रुपये खर्चून प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. पण प्रत्यक्षात काहीच होऊ शकले नाही. आता मंत्री विश्वजित राणे यांनी मासळी आयातीवर बंदी घातली आहे. मात्र, अन्न आणि औषध संचालनालय मजबूत व्हावे यासाठीच काहीच केले जात नाही. लोकांचा विश्वास बसावा यासाठीही सरकारचे प्रयत्न नाहीत. त्याचबरोबर लोकांना स्वस्त मासळी मिळावी यासाठीही सरकारी पातळीवरून प्रयत्न होत नाहीत. मासळी बसमधून व अन्य वाहनातून चोरटय़ा पद्धतीने गोव्यात येते. त्यावरही सरकारचे नियंत्रण नाही.

सरकारची बाजू घेणाऱया चर्चिल आलेमाव यांच्यावरही त्यांनी टीका केली. आता विश्वजित राणे, विजय सरदेसाई, ज्योती सरदेसाई, चर्चिल आलेमाव व इब्राहीम मौलाना यांनी पत्रकार परिषदेतून लोकांना सत्य काय ते सांगावे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

संचालिका सरदेसाई विरोधात कारवाई व्हावी

अन्न आणि औषध संचालनालयाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्या विरोधात कारवाई होण्याची गरज आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी यावेळी केली. फॉर्मेलिन प्रकरणात कारवाई करण्याची सरदेसाई यांची जबाबदारी होती. कारण त्यामध्ये मोठा घोटाळा आहे. चौकशी करण्याचे आदेश मंत्री विश्वजित राणे यांनी दिले होते. ती चौकशी कुठे पोचली. सरकार आपली दुष्कृत्ये लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही रेजिनाल्ड यांनी केला. गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय लोकांचा विश्वास बसणार नाही.

फॉर्मेलिनमधून सुटका नाही

फॉर्मेलिनमधून या लोकांना सुटका मिळणार नसून ही सुरुवात आहे. लोकांची नजर या राजकीय नेत्यांवर आहे. मडगावच्या घाऊक मार्केटमध्ये काय प्रकार चाललाय तो पहा. इब्राहीम मौलाना यांना संरक्षण देण्यासाठी खटाटोप चालला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सन्मानाने खूर्ची सोडावी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने खूर्ची सोडायला हवी. कारभारात पारदर्शकता असेल तर तुम्हाला उत्तर द्यावे लागत नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकांना सतत फसविले. भाजपवाले आज त्यांना संरक्षण देतात. त्यांना गोव्यातील जनतेचे पडलेले नाही. पत्रकारांचीही सरकार फसवणूक करीत आहे. पत्रकार दिनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असे निमंत्रण पत्रावर नमूद होते. प्रत्यक्षात ते आले नाहीत. ते आमदाराना, विरोधी पक्षनेत्यांना भेटत नाहीत. त्यामुळे सरकार लोकांची व पत्रकारांची फसवणूक करीत आहे, असे रेजिनाल्ड यांनी यावेळी सांगितले.

Related posts: