|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणला डिसेंबरमध्ये आरोग्य शिबीर

मालवणला डिसेंबरमध्ये आरोग्य शिबीर 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून उपक्रम : कुडाळ येथे आरोग्य अधिकाऱयांसमवेत बैठक

अठरा वर्षांपर्यंतची मुले, महिलांच्या तपासणीवर विशेष लक्ष केंद्रीत

प्रतिनिधी / कुडाळ:

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून 8 डिसेंबर रोजी कॅन्सर, हृदयविकार, किडनी व मेंदूशी संबंधित आजारांची तपासणी करण्यासाठी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विशेषत: अठरा वर्षांपर्यंतची मुले व महिलांच्या तपासणीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तपासणीनंतर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक व मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटये यांनी शुक्रवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

 येथील एमआयडीसी विश्रामगृहावर शेटये यांची आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांसह बैठक झाली. शिबिराबाबत नाईक व शेटये यांनी नियोजन कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

आर्थिक दुर्बल घटकांसाठी

आरोग्याचे जे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च होतो. परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य होत नाही, अशा व्यक्तींना मोफत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष काम करीत आहे, असे शेटये यांनी सांगून सिंधुदुर्गात असे शिबीर घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यावरून हे शिबीर घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

सहायता कक्षाची मर्यादा वाढविली

सरकारने गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 450 कोटी रु., तर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 650 कोटींचा तसेच अन्य मिळून सुमारे 1350 कोटी रु. खर्चाचे काम केले. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या 25 हजाराच्या मर्यादा तीन लाखापर्यंत वाढविण्यात आल्या आहेत, असे शेटये म्हणाले. येथील शिबिराला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून येथे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

500 रुग्ण तपासणीचे ध्येय

 मुंबई, कोल्हापूर तसेच बांबोळी-गोवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत. 500 रुग्ण तपासणी करण्याचे ध्येय आहे. मात्र, गंभीर आजार व शस्त्रक्रिया आवश्यक आहे. मोठा खर्च आहे, अशाच रुग्णांची नोंदणी केली जाईल, असे शेटये म्हणाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर, सहाय्यता कक्षाचे राजेश सोनार, शिवसेना महिला जिल्हा आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, संजय पडते, नागेंद्र परब, राजन नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 तपासणीवेळी एखादा रुग्ण गंभीर वाटला, तर त्याला तात्काळ उपचारासाठी हलविण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येईल. हार्टच्या रुग्णाबाबत अशी शक्यता आहे. अन्य रुग्णांची तपासणी झाल्यानंतर पुढील उपचारासाठी वेळ दिला जाईल, असे शेटये यांनी सांगितले.

Related posts: