|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोफळकरवाडीला गावठाणच्या सुविधा!

पोफळकरवाडीला गावठाणच्या सुविधा! 

वार्ताहर/ खटाव

उरमोडी योजनेअंतर्गत पुनर्वसन झालेल्या खटाव तालुक्यातील पोफळकरवाडीत गावठाण सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱयांनी महिन्याभरात नियोजित कामे सुरु करण्याची ग्वाही दिली.

उरमोडी योजनेअंतर्गत पुनर्वसन झालेल्या पोफळकरवाडीतील ग्रामस्थ गेल्या सोळा वर्षांपासून गावठाण सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करुनही मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ केली जात आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे गावकऱयांनी गाऱहाणे मांडल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत पोफळकरवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून कामकाजही सुरु झाले आहे. मात्र ग्रामपंचायत इमारत अंतर्गत तसेच प्रमुख रस्ते, समाजमंदीर, जनावरांना पाणी पिण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी हौद, पिण्याच्या पाण्याची योजना, मिळालेल्या जमिनीची मोजणी, जमिन सपाटीकरण, स्मशानभूमी शेड तसेच जनावरे गोठा, शौचालय अनुदान असे प्रश्न प्रलंबित असल्याचे आ. गोरे यांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. 

अधिक्षक अभियंता वि. स. घोगरे, कार्यकारी अभियंता एल. एम. धुळे, गायकवाड, पुनर्वसन अधिकारी भोसले मॅडम यांनी सर्वच कामांचे अंदाजपत्रक तयार करुन महिन्याभराच्या कालावधीत ही कामे सुरु होतील असे सांगितले. बैठकीला कृष्णा पोफळकर, रामचंद्र पोफळकर, मारुती वाघ, सत्यवान वाघ, महादेव पोफळकर, श्रीकृष्ण पोफळकर आणि गावकरी उपस्थित होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून पोफळकरवाडी गावठाण सुविधांपासून वंचित आहे. मात्र आता सर्वच कामांचे अंदाजपत्रक तयार होवून विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार गोरे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.