|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माणच्या मासिक सभेत दुष्काळाचे पडसाद

माणच्या मासिक सभेत दुष्काळाचे पडसाद 

प्रतिनिधी/ दहिवडी

दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेच्या हाताला काम नाही तर पिण्याचे पाणी नाही, अशा परिस्थितीत पाणीपुरवठा केला जात आहे मात्र रोजगार मिळत नाही. त्यासाठी संबधित विभागाने गावागावात जावून सर्वे करून रोजगार हमीची कामे सुरू करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सभापती रमेश पाटोळे यांनी माण पंचायत समितीच्या मासिक सभेत केली आहे.

सभापती रमेश पाटोळे यांनी टँकरमध्ये पाणी भरून देणाऱया फिडींग पॉईंटवर कायम वीज असावी, जेणेकरून टँकरच्या खेपा वेळेवर होतील. ग्रामस्थांना वेळेवर पाणीपुरवठा करता येईल, यासाठी प्रसंगी पंचायत समितीमार्फत एकाद इंजीन उपलब्ध करता येतेय का ते पहावे अशी मागणी केली. पंचायत समिती सदस्यांनी आपल्या गणातील गावात टंचाईची परिस्थिती पाहावी. तालुक्यात 50 टक्क्यांवर गावात स्मशानभूमीच्या नावाने जागा दिसून येते, मात्र त्याठिकाणी स्मशानभूमी नाहीत अशा ठिकाणी स्मशानभूमी होणे गरजेचे आहे.

प्रस्ताव मंजुरीत होतेय दिरंगाई

उपसभापती नितीन राजगे यांनी दहिवडी ग्रामीण रूग्णालयात डिलीव्हरीसाठी महिला रूग्ण आल्यानंतर त्यांना सातारला पाठवले जात असल्याची तक्रार केली. तसेच पिंपरी गावाला दोन वर्षे कृषी सहाय्यकच आला नसल्याचे नमूद केले.   वाटरकप विजेत्या टाकेवाडी (ता.माण) गावाला पाणी का दिले जात नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी तडफडत असताना प्रस्ताव मंजुरीत दिरंगाई केली जात आहे. त्यांना तात्काळ पाणी देण्याची कार्यवाही करावी तसेच प्रस्ताव आल्यानंतर आठ ते दहा दिवसांत त्या गावाना टँकर मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिकअप शेडची कामे निकृष्ठ

लघुपाटबंधारेची कामे खराब होत असून बंधारे गळण्याची शक्यता असल्याने बंधाऱयांची कालमर्यादा कमी होत आहे. ज्ञानेश्वर कदम हे ठेकेदार निकृष्ठ कामे करत आहेत. त्यांच्या कामात त्रुटी आहेत त्यांना कामे देऊ नये, याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर यांनी तोंडलेसह इतर ठिकाणच्या पिकअप शेडची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याची तक्रार केली. आदर्श शिक्षक निवडण्यासाठी निकष लावावेत व केंद्रातून तीन ते चार प्रस्ताव घ्यावेत. त्यानंतर पुरस्कारासाठी नावे जाहीर करावीत असा ठराव सभागृहात करण्यात आला.

2012 साली पशुगणना झाली असून त्याच आधारे 2018 लाही कार्यवाही केली जात आहे. वास्तविक त्यावेळी जनवरांच्या संख्येत व आताच्या संख्येत तिपट वाढ झाली आहे. मात्र दाखले 2012 चेच दिले जातात, त्यामुळे जनावरांना कमी पाणी मिळत आहे. नवीन सर्वे करून पशुगणना करावी अशी चर्चा करण्यात आली.

विविध विभागांचा घेण्यात आला आढावा

अपंगाना 50 टक्के घरपट्टी माफ असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली. आगारात 50 गाडय़ा असून त्यातही जुन्या गाडय़ा आहेत. वाढीव 15 गाडय़ांची गरज असल्याची माहिती दहिवडी एस. टी. आगाराकडून देण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभागृहाची दुरूस्ती करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.