|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुबळीजवळ भीषण अपघातात मुंबईचे 6 ठार

हुबळीजवळ भीषण अपघातात मुंबईचे 6 ठार 

वार्ताहर / हुबळी

हंपी या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी निघालेल्या खासगी बसला झालेल्या अपघातात मुंबईतील सहा प्रवाशांचा दुर्देवी अंत झाला. धारवाड जिह्यातील अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूर येथे शनिवारी पहाटे ही दुर्घटना घडली. अपघातात 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स आणि खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विश्वनाथ म्हात्रे (वय 74) सुमेधा जमखंडी (वय 65), रमेश जयमाला (वय 70), दिनकर म्हात्रे (वय 74), लालू किर्लोस्कर (वय 65), आणि सुचित्रा राहूल (वय 65) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ते सर्वजण घाटकोपर, दादर येथील रहिवासी आहेत.

आदित्य धवकी, सोनल म्हात्रे, किशोर शलाके, मधूनाथ म्हात्रे, चंद्रकांत राहूल, पुंडलिक बापूडणकर, रूचुसा उल्हे, सविता कुरबर, प्रभाकर, दीपिका म्हात्रे, हर्षिता म्हात्रे आणि लालन अशी जमखींची नावे आहेत. जखमींपैकी 13 जणांना हुबळीतील किम्स इस्पितळात तर तिघांना अन्नीगेरी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मुंबईतील प्रवासी खासगी बसने कर्नाटकातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते. बस गदग रोडने हंपीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱया ट्रकला धडकली त्यामुळे बस रस्त्याकडेला उलटली दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त ट्रकही महाराष्ट्र नोंदकीचा आहे.

बसमध्ये चालक, क्लिनरसह 40 जण होते. त्यामध्ये 20 महिला, 7 मुले आणि पुरुषांचा समावेश होता. अपघातात सहाजण जागीच ठार झाले. बसचालक विरभद्रप्पा मंजप्पा आणि क्लिनर राजेश गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स इस्पितळात उपचार सुरु आहेत. दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. हुबळी ते होस्पेट पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे एक बाजूने वाहतूक सुरु आहे. हुबळीपासून 30 कि. मी. अंतरावरील भद्रापूर नजीक रस्त्यावर ट्रक थांबला होता. त्यामुळे मागून येणाऱया दुसऱया ट्रक चालकाने आपले वाहन बाजूने नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून आलेल्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

खासगी टुरीस्ट कंपनी मार्फत 7 दिवसांच्या पर्यटनासाठी मुंबईतील प्रवासी कर्नाटकात आले होते. बेंगळूरला आल्यानंतर पूर्वी बुकींग केलेल्या खासगी बसमधून 7 दिवसांपासून राज्यातील विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. शुक्रवारी मंगळूर जिह्यातील धर्मस्थळ, सुब्रम्हण्य, गोकर्ण, मुर्डेश्वरला भेटी दिल्या. त्यानंतर रात्री हुबळीतील खासगी हॉटेलच्या लॉजमध्ये वास्तव्य केले. शनिवारी शेवटच्या दिवशी हंपीचा प्रवास आटोपून ते मुंबईला मार्गस्थ होणार होते. मात्र, शेवटच्या दिवशीच काळाने सहा जणांवर घाला घातला.

कुटुंबातील सदस्यांना माहिती

मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना पोलिसांनी फोनवरून दुर्घटनेविषयी माहिती दिली. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री किंवा रविवारी पहाटे मृत आणि जखमेंचे कुटुंबीय हुबळीत दाखल होतील. अन्नीगेरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Related posts: