|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भगवंतामध्ये दहा भावांचे दर्शन

भगवंतामध्ये दहा भावांचे दर्शन 

श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदन्त घेऊन काही गोपाळांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले. ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ भवनात आले, तेव्हा ते पहिलवानांना वज्रकठोर, सामान्य लोकांना नररत्न, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव, गोपांना आप्त, दुष्ट राजांना शासन करणारे, त्यांच्या माता पित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू, अज्ञानी लोकांना सामान्य बालक, योग्यांना परम तत्त्व आणि वृष्णवंशियांना श्रे÷ देव आहेत असे वाटले. सर्वांना एकाच भगवंतांमध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक, बीभत्स, शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला.महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला सांगतात-राजन! कंस मोठा धीराचा पुरुष होता, तरीसुद्धा कुवलयापीडाला मारल्याचे पाहून त्याच्या लक्षात आले की, यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे. त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला. महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार, वस्त्रे आणि अलंकार यामुळे सुंदर दिसत होते. असे वाटत होते की, उत्तम वेष धारण करून दोन नटच आले आहेत. त्यांच्या तेजामुळे पाहणाऱयांची मने त्यांच्यावरच खिळून जात. ते दोघेजण आखाडय़ात असे शोभून दिसत होते. परिक्षिता! त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले. त्यांच्या मुखांकडे कितीही पाहिले, तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते. जणू काही ते त्यांना डोळय़ांनी पीत, जिभेने चाटीत, नाकाने हुंगीत आणि हातांनी धरून हृदयाशी कवटाळीत. त्यांचे सौंदर्य, गुण, माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लीलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्यासंबंधी पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू ऐकू लागले, ते असे-हे दोघेजण साक्षात भगवान नारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. हे सावळे देवकीपासून जन्मले होते. वसुदेवांनी यांना गोकुळात नेले होते. इतके दिवस ते तेथेच नंदांच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले. यांनीच पूतना, तृणावर्त, शंखचूड, केशी, धेनुक यांसारख्या दैत्यांचा वध केला. शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला. यांनीच गाई आणि गोपालांना दावानलापासून वाचविले होते. तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचासुद्धा मानभंग केला होता. यांनीच सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ, पाऊस आणि वीज यांपासून गोकुळ वाचविले. असे म्हणतात की, हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी, यश आणि गौरव प्राप्त करील. हे दुसरे याच श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्रीबलराम आहेत. यांनीच प्रलंबासुर, वत्सासुर आणि बकासुर इत्यादींना मारले आहे. उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती, त्यावेळी तुतारी इत्यादी वाद्ये वाजत होती. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मंद मंद हास्य करीत, डौलाने धीरगंभीरपणे एक एक पाऊल टाकीत आखाडय़ाकडे चालले होते.

Ad. देवदत्त परुळेकर