|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भेंडी बाजार रुंदीकरणासाठी 30 फुटाचा पर्याय

भेंडी बाजार रुंदीकरणासाठी 30 फुटाचा पर्याय 

प्रतिनिधी/ बेळगाव

पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरणास सुरूवातीस विरोध झाल्याने 30 फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भेंडीबाजार रस्त्याचेही रुंदीकरण 30 फूट करण्याचा प्रस्ताव मालमत्ताधारकांसमोर ठेवण्यात आला आहे. याबाबत मालमत्ताधारकांची बैठक घेऊन आठ दिवसांमध्ये निर्णय कळविण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी मालमत्ताधारकांना केली.

भेंडीबाजारातील रस्ता रुंदीकरणास मालमत्ताधारकांनी विरोध दर्शविला असल्याने काम रखडले आहे. यामुळे याबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी मालमत्ताधारकांची बैठक सोमवारी महापालिका कार्यालयातील कक्षात बोलावली होती. पांगुळ गल्ली रस्ता रुंदीकरणास विरोध दर्शविल्याने याबाबत 30 फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय घेऊन काम सुरू करण्यात आले आहे.  भेंडीबाजारदेखील शहराची महत्त्वाची बाजारपेठ आहे. यामुळे याठिकाणी नेहमी वर्दळ असते. अरुंद रस्त्यामुळे व्यापारी, रहिवासी आणि ग्राहक अशा सर्वांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती भागाचा विकास होणे आवश्यक आहे. रस्ता अरुंद असल्याने एखादे वाहन जाण्यास मोठय़ा प्रमाणात अडथळे आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी वाढविणे आवश्यक आहे. व्यापारी आणि मालमत्ताधारकांनी सारासार विचार करून रुंदीकरणास सहकार्य करण्याची विनंती आमदार अनिल बेनके यांनी केली.

रस्त्याची रुंदी 45 फूट करण्यात आल्यास बहुतांश मालमत्ताधारकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार आहे. मालमत्ताधारकांना भरपाई देण्याबाबत मनपा कोणताच विचार करीत नाही. यामुळे नुकसानग्रस्त मालमत्ताधारकांना भरपाई देण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच रस्त्याची रुंदी वाढविण्याऐवजी पर्यायी उपाययोजना राबविण्याची मागणी मालमत्ताधारकांनी केली. यापूर्वी या ठिकाणी वनवे करण्यात आला होता. त्याचप्रमाणे हा रस्ता वनवे करून केवळ दुचाकी वाहनधारकांना प्रवेश देण्यात यावा, असे पर्याय रहिवाशांनी सुचविले.

पण हा पर्याय नसून केवळ काही नागरिकांची सोय होणार आहे. व्यापारी, ग्राहक आणि रहिवाशांच्या सोयीच्यादृष्टीने विचार होणे आवश्यक असल्याचे मत आमदार बेनके यांनी क्यक्त केले.

… तरीही रस्ता रुंदीकरण होणारच

रुंदीकरणामुळे आवश्यक सुविधा मिळण्यासह क्यावसायिकांच्यादृष्टीने फायद्याचे होणार आहे. यामुळे 45 ऐवजी किमान 30 फुटाचा रस्ता करण्यासाठी रहिवाशांनी व मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे. रुंदीकरणामध्ये पूर्ण नुकसान होणाऱया मालमत्ताधारकांना महापालिकेच्यावतीने भरपाई देण्यात येईल. तसेच तातडीने इमारत बांधकाम परवाना आणि विकास शुल्क माफ करण्यात येईल. यामुळे मालमत्ताधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याबाबत आठ दिवसात निर्णय कळविण्याची सूचना केली. मालमत्ताधारकांनी सहकार्य केले नाही तरी रस्ता रुंदीकरण होणारच असा इशारा देखील आमदार अनिल बेनके यांनी दिला.

 यावेळी माजी उपमहापौर मीना वाझ, माजी नगरसेवक रायमन वाझ, साहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही. एस. हिरेमठ आदीसह भेंडीबाजार परिसरातील मालमत्ताधारक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.